आंध्रप्रदेश | 8 सप्टेंबर 2023 : जर तुमच्याकडे जिद्द असेल तर तुम्ही काहीही चमत्कार करु शकता. त्यासाठी तुम्हाला तांत्रिक ज्ञान नसले तरी अडचणींवर मात नवनिर्मिती घडवू शकता. आता आंध्र प्रदेशातील एलरु जिल्ह्यातील द्वारकाथिरुमाला येथील कोम्मारा गावातील मंदा दिलीप कुमार या तरुणाने केवळ युट्युबवर पाहून इलेक्ट्रीक बाईक तयार केली आहे. पेट्रोल आणि डीझेलचे वाढते भाव पाहून त्याला इलेक्ट्रीक बाईक बनविण्याची प्रेरणा मिळाली. त्यासाठी त्याने युट्युबवर बरेचसे व्हीडीओ पाहिले आणि भंगारातून जुनी प्लॅटीना बाईक विकत घेतली. त्यानंतर तिला इलेक्ट्रीक बाईक बनविले. त्याच्या इलेक्ट्रीक बाईकची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
मंदा दिलीप कुमार याने द्वारकाथिरुमाला संस्कृत शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. नंतर त्याने एका खाजगी महाविद्यालयात पुढील शिक्षण पूर्ण केले. दिलीप याला तांत्रिक गोष्टी बनवायला जास्त आवडतात. त्याने शालेय जीवनात अनेक विज्ञान प्रदर्शनात अनेकदा सहभाग घेतला होता. त्यासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले. पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांना बाईक वापरणे अवघड झाले आहे. त्यामुळे दिलीप कुमार याला बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक बाइक कमी खर्चात बनवायची होती. त्याने युट्युबवर इलेक्ट्रिक बाइक कशी बनवायची याचे व्हिडीओ पाहिले. त्यासाठी कोणती उपकरणे लागतात ते पाहीले. जुन्या प्लॅटिना बाइकला बॅटरी आणि इतर साधने ऑनलाइन खरेदी करीत बसवली आणि इलेक्ट्रिक बाइक बनवली. त्यांनी बनवलेली इलेक्ट्रिक बाइक चार तास चार्ज केल्यास 60 ते 70 किलोमीटरचा प्रवास करते.
या इलेक्ट्रिक बाइक बनवण्यासाठी दिलीप कुमारचा केवळ 17 हजार रुपयांचा खर्च आला. एवढ्या कमी खर्चात इलेक्ट्रिक बाईक बनविल्याबद्दल गावातील लोक दिलीप कुमार यांचे कौतुक करत आहेत. त्याने बनवलेल्या इलेक्ट्रीक बाईकवर तीन लोकही सहज प्रवास करू शकतात. ही बाईक एका छोट्या कुटुंबासाठी खूप उपयुक्त आहे. दिलीप कुमार जिथे जातात तिथे ते या बाईकवरुन जातात आणि परतीचा प्रवासही करतात. एका चार्जिंगमध्ये हे शक्य होतं. पण जर सरकारने दिलीप कुमारची प्रतिभा ओळखून त्याला प्रोत्साहन दिले तर आपण अनेक नवनवीन शोध लावू असे दिलीप कुमार सांगतात.