लखनौ : उत्तर प्रदेशातील( Uttar Pradesh) एका लग्न(marriage) सोहळ्याची चांगलीच चर्चा आहे. तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या नवरदेवाची लग्नासाठी 4 तास सुटका करण्यात आली. पोलिस बंदोबस्तात हा लग्नसोहळा उरकला. लग्न लागल्यानंतर नवरदेवाची पुन्हा तुरुंगात रवानगी करण्यात आली. विशेष म्हणजे नवरी मुलीनेच नवरदेवाविरोधात तक्रार दाखल केली होती. तिने केलेल्या तक्रारीमुळेच नवरदेव तुरुंगात गेला आहे. मात्र, याचा खटला न्यायालात सुरु असतानाच दोघांनी वाद बाजूला ठेवून ठरलेल्या मुहूर्तावर लग्न सोहळा उरकला आहे.
उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये हा अजब लग्नसोहळा पार पडला. तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या नवरदेवाची केवळ 4 तासांसाठी पॅरोलवर सुटका करण्यात आली. या चार तासांत त्याचा विवाह झाला. लग्नसोहळा आटोपल्यानंतर त्याची रवानगी पुन्हा तुरुंगात करण्यात आली. अमित कुमार असे नवरदेवाचे नाव आहे.
चार महिन्यांपूर्वीचे हे प्रकरण आहे. शाहजहांपूर येथील अमित कुमारशी एका 24 वर्षीय तरुणीचे लग्न ठरले होते. काही कारणांवरून दोघांमध्ये वाद निर्माण झाले. त्यामुळे अमितने लग्नास नकार दिला होता. त्यानंतर सोनमने अमित विरोधात फसवणूक व शारीरिक अत्याचाराची तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी अमितला अटक केली. यानंतर कोर्टाने त्याला पोलिस कोठडी सुनावली. अमितवर कलम 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यात त्याला तुरुंगवासही झाला.
तरुणीच्या तक्रारीनंतर अमित तुरुंगात गेला. त्यानंतर तरुणाच्या कुटुंबीयांनी प्रकरण सामोपचाराने सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. तक्रार दाखल करणाऱ्या तरुणीशी मुलाचा विवाह लावून देण्यासाठी त्यांनी तयारी दर्शवली. यावर दोन्ही कुटुंबांमध्ये एकमत झाले. तरुण-तरुणी दोघेही लग्नासाठी तयार झाले. त्यानंतर दोघांनी न्यायालयात जाऊन प्रतिज्ञापत्र दाखल केले. लग्नासाठी दोघेही तयार असल्याचे त्यात नमूद केलेले होते.
नवरा-नवरी आणि त्यांचे कुटूंबिय लग्नासाठी तयार झाल्यावर पोलिसांनी देखील लग्नासाठी परवानगी दिली. पोलिसांनी तरुणाला 4 तासांसाठी पॅरोल सुटी मंजुर केली. चार तासात पोलिसांच्या बंदोबस्तात हा लग्न सोहळा पार पडला. लग्नानंतर आता याचा पुरावा न्यायालयात सादर केला जाणार आहे. या प्रकरणावर पुढील निर्णय नंतर होणार आहे.
पोलिस व्हॅनमधून नवदेवाला विवाहस्थळी आणण्यात आले. विवाह सोहळ्याच्या ठिकाणी खास पोलिस कर्मचारी देखील तैनात होते. नवरदेवाच्या चारही बाजूला पोलिस उपस्थित होते. मंदिरातच नवरदेवाला तयार करण्यात आले. हा अनोखा विवाह पाहण्यासाठी परिसरातील नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.