गेल्या सहा महिन्यात सर्वसामान्याच्या हाती अलादीनचा चिराग लागला आहे. ‘जो हुकूम मेरे आका’ असं म्हणत तो जगभराचा पसारा वाचकांच्या अगदी पुढ्यात आणून ठेवतो. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI-Artificial Intelligence) मुळे जगात नवीन क्रांती आली आहे. डिपफेक, चॅटजीपीटी,जेमिनी आणि ग्रोक एआयने जगाला वेड लावले आहे. कोणताही प्रश्न टाका, उत्तर अगदी पुढ्यात. एकदम तयार. एआयचा या कंपनीने शोध लावला, त्या कंपनीचे त्यावर काम सुरू आहे, असे आपण वाचतो. पण 30-40 वर्षांपूर्वीच या तंत्रज्ञानाचे भाकीत कोणी केले असेल तर? त्यापेक्षा पुढे जाऊन जो शोध लागलाच नाही, त्यावर काम करण्यास जगभरातील शास्त्रज्ञ उत्सुक आहेत, अशी घटना अगोदरच कोणी नोंदवली असेल तर? तुम्ही म्हणाल हा धक्का पचवायचा कसा? तर बाबा वेंगा या गूढवादी भविष्यवेतीने अगोदरच या शोधांचे गूढ काव्यात ओवीबद्ध माहिती दिल्याचा दावा करण्यात येत आहे. खरंच असं घडलंय का?
बाबा वेंगा, ही बल्गेरियातील गूढदर्शी (मिस्टिक) आणि भविष्यातील घटनांचे भाकीत करणारी दूरदर्शी अद्भूत व्यक्ती म्हणून सर्वपरिचित झाली आहे. तर या वेंगा बाईने तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल(AI) काही भविष्यवाण्या केल्या आहेत. अर्थात तिचे गूढ काव्य आणि त्याची माहिती हे तिचे अनुयायीच देतात. त्यामुळे त्यावर किती विश्वास ठेवावा ही प्रश्न आहेच म्हणा.
AI बद्दल बाबा वेंगाची कथित भाकिते
एआय सध्या प्राथमिक अवस्थेत आहे. एआयच्या जनकांनी हा अगदी भातुकलीचा खेळ असल्याचे म्हटले आहे. येत्या दोन वर्षात असे अचंबित तंत्रज्ञान समोर येईल की, सध्याचे एआय हे अगदी खुळखुळा वाटेल असा दावा एआय जगासमोर आणणाऱ्या शास्त्रज्ञांनीच केला आहे. एका अंदाजानुसार, बाबा वंगा हिने असे भाकीत केले होते की, AI अत्यंत प्रगत होईल आणि मानवी निर्णय प्रक्रियेवर नियंत्रण मिळवेल. 2025-2030 या वर्षादरम्यान AI चा वाढता प्रभाव दिसून येईल. एआयमुळे मानवी जीवनात वादळं येतील आणि त्यांना धोका होईल असा दावा करण्याशी हा तर्क सुसंगत वाटतो.
मानव आणि यंत्रांचे एकत्रीकरण
बाबा वेंगाने एआय तंत्रज्ञानाच्या पुढे जाऊन ज्याला सध्या आपण सायन्स फिक्शन वगैरे म्हणतो असे मोठे भाकीत केले आहे. तिने भविष्यवाणी केली आहे की, AI आणि मानवी मेंदू एकत्र येतील, कदाचित ब्रेन-मशीन इंटरफेस अथवा AI ने सुधारलेले मानवी जीवन याविषयी तिची भविष्यवाणी असेल. एलॉन मस्कच्या Neuralink प्रकल्पाशी तिचा हा अंदाज अगदी मिळता जुळता आहे. या तंत्रज्ञानावर मस्क याची टीम काम करत आहे.
21व्या शतकाच्या मध्यापर्यंत AI मध्ये मोठी क्रांती करेल असे भाकीत बाबा वेंगा हिने व्यक्त केले आहे. AI मानवी बुद्धीपेक्षा अधिक प्रगत होईल आणि यामुळे जागतिक सत्ता आणि उद्योगांमध्ये मोठे बदल घडतील, असे भाकीत तिने गूढरित्या नोंदवल्याचा दावा तिचे अनुयायी करतात.
डिस्क्लेमर : या दाव्यांबद्दल पुरेशी आणि ठोस पुरावे किंवा अधिकृत दस्तावेज उपलब्ध नाही. बाबा वांगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.