सोशल मीडिया किंवा बातम्यांमध्ये तुम्ही सेलिब्रिटिजचा एअरपोर्टवरील लूक नेहमी पाहत असता. सेलिब्रिटिजला पाहून सामान्य लोकही एअरपोर्टवर जातात. मात्र, सामान्य लोक असे काही कपडे परिधान करतात की पाहणारे पाहत राहतात. प्रवास करताना आरामदायक आणि प्रवासाला अनुरूप कपडे परिधान केले पाहिजे हे त्यांना कळत नाही. एका पायलटच्या बायकोने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यात तिने एअरपोर्टवर जाताना कोणते कपडे घातले पाहिजे, याची माहिती दिली आहे. खासकरून त्यांच्या टिप्स मुली आणि महिलांसाठी आहेत. पण पुरुषांनीही ही बातमी वाचली पाहिजे. कारण तुमच्यासोबत कुटुंबातील कोणताही महिला प्रवास करू शकते. त्यामुळे त्यांनी विमानातून जाताना कसे कपडे परिधान केले पाहिजे याची माहिती तुम्हालाही असणे आवश्यक आहे.
न्यूयॉर्क पोस्टने याबाबतचं वृत्त दिलं आहे. लॉरी नावाची कंटेंट क्रिएटर ही एका पायलटची बायको आहे. टिकटॉकवर ती प्रवासाशी संबंधित रोचक व्हिडीओ करत असते. तिने सोशल मीडियावर What to Wear At Airport या नावाने एक व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओत तिने विमानतळावर जाताना आणि विमानातून प्रवास करताना कशा पद्धतीने पेहराव ठेवला पाहिजे याचा सल्ला तिने दिला आहे. तिच्या सल्ल्यानुसार, कोणतेही कपडे कमरेला बांधू नये. बऱ्याचदा काही लोकांना शर्ट, स्वेटर, स्वेटशर्ट वा जॅकेट कमरेला बांधण्याची सवय असते. असं केल्याने सेक्युरिटी चौकशीवेळी तुम्हाला त्रास होऊ शकतो. तपासणीत वेळ जाण्याची शक्यता असते. तुमच्या हालचाली मंद होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही एन्ट्री गेटवर उशिराने पोहोचाल.
झगामगा म्हणजे चमकणारे, तारे असणारे किंवा बीड लागलेले कपडे घालू नका. त्यामुळे तुम्हाला विमानापर्यंत पोहोचायला उशिर होऊ शकतो. असा ड्रेस घातल्याने विमानापर्यंत पोहोचायला वेळ कसा होऊ शकतो? असा प्रश्न काही लोकांना पडेल. त्याबाबत तिने सांगितलं की, अमेरिकेत ट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी अथॉरिटीने एक नियम बनवला होता. या नियमानुसार, विमानतळावर चमकणारे कपडे, फ्लॅशी कपडे घालू नये. कारण असे कपडे घालून आल्यास त्याची प्रचंड तपासणी केली जाते. या कपड्यांमुळे त्यांची अनेकवेळा तपासणी केली जाते. त्यामुळे असे कपडे तुमच्या सामानात पॅक केलेलेच बरे.
काही काळापूर्वी टॉमी सिमैटो नावाच्या फ्लाइट अटेंडंट आणि कंटेंट क्रिएटरने लोकांना कपडे घालण्याबाबत एक खास सल्ला दिला होता. तिने सांगितले की, फ्लाइटमध्ये शॉर्ट्स किंवा स्कर्ट घालून मुलींनी प्रवास करू नये. याचं मुख्य कारण म्हणजे विमानातील सीट्स स्वच्छ नसतात. त्यामुळे स्कर्ट घालून प्रवास केल्यास त्वचेला बॅक्टेरिया चिकटण्याचा धोका असतो. पूर्ण कपडे, पँट किंवा जीन्स घातल्याने ते पायावर चिकटणार नाहीत. याचप्रमाणे छोटे कपडे आपत्कालीन परिस्थितीत देखील उपयोगी ठरू शकत नाहीत.
जर कोणत्याही आपात्कालीन स्थितीत प्रवाशांना विमानातून स्लाइड करून खाली उतरायचं किंवा एखाद्या दगडाळ जागेवर उतरायचं असेल, तर शॉर्ट्स किंवा स्कर्ट घालून त्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याचप्रमाणे, लोकांना त्यांचे बूट देखील खूप महत्त्वाचे असतात. चप्पल घालून प्रवास करणे टाळावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.