आंध्रप्रदेश | 8 सप्टेंबर 2023 : भारतीय समाजात मुलामुलींच्या लग्नासाठी आई-वडील प्रसंगी कर्जबाजारी होत असतात. डोक्यावर मोठे कर्ज काढून मुलांची लग्नं थाटामाटात करणारेही कमी नाहीत. राजकारणातील व्यक्ती असेल तर साध्या नगरसेवकापासून ते लोकप्रतिनिधीपर्यंतची मंडळी मुला-मुलींच्या विवाहात इतका वारेमाप पैसा खर्च करीत असतात की त्यांच्या मुलांची लग्नं म्हणजे त्यांच्या श्रीमंतीचे एकप्रकारचे जाहीर प्रदर्शनच होत असते. आणि मुलांनी जर आंतरजातीय विवाह केला असेल तर खोट्या प्रतिष्ठेपायी अशा मुलांचा पाठलाग करण्यापासून त्यांना संपविण्यापर्यंतच्या घटनांनी आपल्या समाजाचे भीषण वास्तव समाजासमोर अधूनमधून येत असते. अशात एका लोकप्रतिनिधीने आपल्या कृतीने एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे.
राजकारणात अगदी वॉर्ड सदस्यापासून ते मंत्र्यांपर्यंतची मंडळी आपल्या मुलामुलींच्या लग्नात इतका पैसा खर्च करतात लग्न म्हणजे जणू आपला राजकारणातील प्रभाव दाखविण्याचे एक माध्यम बनले आहे. आंध्रप्रदेशातील कडप्पा जिल्हा पोड्डुतूर मतदारसंघातील आमदार रचमल्लू शिवप्रसाद रेड्डी यांनी आपल्या मुलीचा विवाह अतिशय साध्या आणि पारंपारिक पद्धतीने केला. आमदार रचमल्लू यांची मुलगी पल्लवी हीचे शाळेतील मित्राशी प्रेम असल्याचे सांगत आपण त्याच्याशीच लग्न करणार असे तिने वडीलांना सांगितले. हा आंतरजातीय विवाह आहे. विवाह ज्याच्याशी होणार तो गरीब घरातील मुलगा आहे. त्यांनी जात किंवा पैसा न पाहता मुलीच्या इच्छेसाठी विवाहाला समंती दिली.
या दोघांचा विवाह पोद्दुथुरच्या बोल्वाराम वेंकटेश्वर स्वामी मंदिरात थोरामोठ्यांच्या आशीवार्दाने पारंपारिक पद्धतीने झाला. त्यानंतर गुरुवारी सकाळी 11 वाजता त्यांची मुलगी पल्लवीसोबत आमदार रचमल्लू स्वत: सब-रजिस्टार कार्यालयात आले आणि त्यांनी दोघांच्या विवाहाला साक्षीदार म्हणून सही करीत विवाहाची नोंदणी केली आणि विवाहाचे प्रमाणपत्र घेतले. मुलीच्या आनंदासाठी आपल्याला तिचा आंतरजातीय विवाह करण्यात कोणताही संकोच वाटत नसल्याचे सांगत प्रोडडुतुरच्या सर्व लोकांनी दोघांनाही आशीर्वाद द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हा एक आदर्श विवाह झाला असून आपण आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी मुलीचा विवाह मोठ्या थाटामाटात करायचे ठरविले होते. परंतू मुलीने तिचे लग्न एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे साधे पण शालीनतेने व्हावे अशी तिने अट घातली होती. त्यामुळे हा आदर्श विवाह सोहळा विशेष ठरला.