मुंबई : आपलं हक्काचं घर असावं, असं कुणाला नाही वाटत? हक्काचं घर मिळण्यासाठी सगळेचजण मेहनत करतात. पण काही लोक निस्वार्थपणे आयुष्यभर समाजाची सेवा करतात. अन् मग आयुष्याच्या काठी समाजातील संवदेनशील लोक त्यांना सुखद आनंदाचा धक्का देतात. असंच काहीसं घडलंय, इडली अम्माच्या बाबतीत…तामिळनाडूमध्ये लोकांना अवघ्या 1 रुपयात इडली खाऊ घालणाऱ्या इडली अम्माला (Idli Amma) स्वतःचं हक्काचं नवीन घर मिळालं आहे. आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी त्यांना एक वचन दिलं होतं. ते वचन त्यांनी मदर्स डेच्या निमित्ताने पूर्ण केलंय.
तामिळनाडूतील कोईंबतूर जिल्ह्यात राहणाऱ्या एम.कमलाथल यांनी केवळ एक रूपयात इडली विकतात. दिवसेंदिवस महागाई वाढत गेली पण त्यांनी आपल्या इडलीची किंमत वाढवली नाही. त्या त्याच दरात लोकांना इडली खावू घालत राहिल्या.
आनंद महिंद्रा यांनी 10 सप्टेंबर 2019 मध्ये इडली अम्माचा एक व्हिडिओ शेअर केला होता. “इडली अम्माच्या उद्योगात गुंतवणूक करणं आणि त्यांना चुलीऐवजी गॅस स्टोव्ह देणार असल्याचं सांगितलं. “, असं त्यावेळी ते म्हणाले होते. त्यानंतर जेव्हा महिंद्रा यांच्या कंपनीतील काही लोक इडली अम्माला भेटायला गेले तेव्हा त्यांनी नव्या घराची इच्छा व्यक्त केली. त्यांची ती इच्छा आनंद महिंद्रा यांनी आता पूर्ण केली आहे.
इडली अम्माला नवीन घर दिल्याची माहिती स्वतः आनंद महिंद्रा यांनी ट्विट करुन दिली आहे. “मदर्स डे निमित्त मला इडली अम्माला घर द्यायचं होतं. त्यासाठीचं बांधकाम वेळेत पूर्ण झालं. इथून पुढेही त्या असंच लोकांना त्यांच्या आवडीची इडली खावू घातलीत. त्यांना दीर्घायुष्य लाभो. मदर्स डेच्या शुभेच्छा”, असं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलंय
Immense gratitude to our team for completing the construction of the house in time to gift it to Idli Amma on #MothersDay She’s the embodiment of a Mother’s virtues: nurturing, caring & selfless. A privilege to be able to support her & her work. Happy Mother’s Day to you all! pic.twitter.com/LgfR2UIfnm
— anand mahindra (@anandmahindra) May 8, 2022