भुवनेश्वर : लग्न म्हटलं की रुसवे-फुगवे आलेच. बऱ्याच वेळा मंडपात वऱ्हाडी, हे एखादी मागणी घेऊन अडून बसतात, मग त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुलीकडच्या लोकांची तारांबळ उडते. मात्र काही वेळेस वधूच त्यांना इंगा दाखवते. सध्या अशाच एका आगळ्या-वेगळ्या लग्नाची (marriage) चर्चा रंगली आहे. वधूला आणण्यासाठी वऱ्हाडं गेलं खरं पण त्यांच्या वागण्यामुळे वरासह सर्वजण रिकाम्या हाती परतले. ओदिशा येथील सुंदरगढ येथे ही घटना घडली आहे. साध्या मटणाच्या (mutton) मुद्यावरून हे लग्न मोडले आणि वराकडचे मान खाली घालून परतले.
लग्नात वऱ्हाडाकडील लोकांना मटण कमी पडलं, म्हणून वराकडच्यांनी आणखी मटणाची मागणी केली. मात्र यानंतर वधूने सरळ लग्नचं मोडलं. वाचून धक्का बसला ना ? हे पूर्ण प्रकरण काय आहे, ते जाणून घेऊया.
नो मटण नो मॅरेज
संबलपूर जिल्ह्यातील धामा भागातून ही विचित्र घटना समोर आली आहे. वर हा मूळचा संबळपूर येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका राष्ट्रीयकृत बँकेत काम करणाऱ्या वराचे लग्न ठरले. रविवारी सर्वजण वरात घेऊन निघाले आणि संबलपूरमधील ऐंथापली येथे वधूच्या घरी पोहोचला. जेवताना वऱ्हाडातील ७-८ लोकांना मटण कमी पडले.
आणखी मटण मागितल्याने वधूने लग्न मोडलं
मात्र रात्री बराच उशीर झाल्याने वधूकडील लोक आणखी मटणाची व्यवस्था करू शकले नाहीत. पण वराकडील मंडळी त्यांच्याच मागणीवर अडून राहिल्याने मोठ्या वादात रुपांतर झाले. त्यांच्या या वागण्यामुळे व्यथित झालेल्या वधूने हे लग्न मोडत सासरी जाण्यास नकार दिला.
याबाबत वधूने सांगितले की, सगळं काही व्यवस्थित होते. सर्वांना जेवणात मटणहीण दिले होते. पण शेवटच्या काही लोकांना मटण कमी पडले. त्यामुळे त्यांनी माझ्या वडिलांवर गैरव्यवस्थापनाचा आरोप केला आणि वाद घालायला सुरुवात केली. माझे आई-वडील आणि इतर नातेवाईकांनी वराकडच्या लोकांची समजूत घालायचा प्रयत्न केला. तसेच जेवणात मटणाऐवजी चिकन आणि मासे देऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते त्यांच्या मटणाच्या मागणीवर ठाम होते आणि आमच्याशी गैरवर्तन करू लागले, असेही वधूने सांगितले.
माझे वडील त्यांच्यासमोर नतमस्तकही झाले आणि त्यांना विनंती केली. मात्र वराकडील मंडळी त्यांच्या मागण्यांवर ठाम होती. मला हे अतिशय चुकीचं वाटलं. माझ्या वडिलांना इतर कोणासमोरही झुकताना मी पाहू शकत नव्हते. त्यामुळे मी हे लग्न न करण्याचा निर्णय घेत, वऱ्हाडींना परत जाण्यास सांगितले, असे वधूने नमूद केले.
यापूर्वी आदिवासीबहुल कंधमाल जिल्ह्यात नुकतीच अशीच एक घटना समोर आली होती. जेव्हा एका वधूने तिच्या पतीने हुंड्यात दुचाकी मागितल्याने सासरचे घर सोडले होते.
वराने फेटाळले आरोप
दुसरीकडे, वराकडील मंडळींनी वधूच्या बाजूने लावण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे. “त्यांनी सांगितले की 200 लोकांची व्यवस्था करण्यात आली होती. आमच्या मिरवणुकीत सुमारे 150 लोक होते आणि त्यापैकी अनेकांना जेवणच मिळाले नाही. माझ्या वडिलांनी ही बाब वधूच्या काकांना सांगितल्यावर त्यांनी आमच्याशी गैरवर्तन केले. लग्न रद्द होण्यामागे मटण हे कारण नाही,” असे स्पष्टीकरण वराने दिले.