भुसुरूंग (Landmines) शोधण्याच्या कामात तरबेज असलेल्या, सुवर्णपदक जिंकलेल्या माइन स्निफिंग हिरो उंदरा(Rat)चा वयाच्या आठव्या वर्षी मृत्यू झालाय. कंबोडिया(Cambodia)तली ही घटना आहे. एका अहवालानुसार या उंदरानं त्याच्या कार्यकाळात 100हून अधिक भूसुरुंग आणि इतर स्फोटकं शोधून दिली होती. तो UKचं PDSA गोल्ड मेडल मिळविणारा पहिला उंदीरदेखील ठरला, जो जॉर्ज क्रॉस प्राण्यांच्या समतुल्य आहे.
APOPOची घोषणा
मंगळवारी या बातमीची घोषणा APOPO या स्वयंसेवी संस्थेनं केली. त्यांनी म्हटलं, की आम्ही जड अंतःकरणानं ही दुःखद बातमी सांगतो आहोत, की HeroRAT Magawa याचा या आठवड्याच्या अखेर मृत्यू झाला. मगावाची तब्येत चांगली होती. गेल्या आठवड्यातला बहुतेक वेळ त्यानं त्याच्या नेहमीच्या उत्साहानं खेळण्यात घालवला. मात्र आठवड्याच्या शेवटी तो काहीसा सुस्त झाला. त्याचा वेग अचानक कमी झाला. त्यानं खाणंही एकदमच कमी केलं. त्यातच त्याचा मृत्यू झाला. मगावाचा नुकताच नोव्हेंबरमध्ये 8 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वाढदिवस साजरा करण्यात आला.
APOPOचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी उंदीर
त्यानं त्याच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत 100हून अधिक भूसुरुंग आणि इतर स्फोटकं शोधून दिली होती. त्यामुळे तो APOPOचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी उंदीर बनला होता. त्यानं 2,25,000 चौरस मीटरपेक्षा जास्त जमीन साफ करण्याचं व्यवस्थापन केलं होतं. सुमारे 31 फुटबॉल खेळपट्ट्यांच्या समतुल्य, 71 भूसुरुंग आणि 38 स्फोट न झालेल्या शस्त्रास्त्रांचा शोध लावला असल्याचं संस्थेनं सांगितलं.
देण्यात आलं होतं प्रशिक्षण
APOPOमधल्या आम्हा सर्वांना मगावाची कमी जाणवत आहे. त्यानं केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, असं संस्थेनं म्हणत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. 2016मध्ये कंबोडियाला जाण्यापूर्वी या उंदराचा जन्म टांझानियामध्ये झाला होता. त्याला प्रशिक्षण देण्यात आलं होतं. APOPOनुसार, या उंदराची बुद्धिमत्ता आणि वास घेण्याची तीव्र भावना यामुळे खाणीत काम करणाऱ्या कामगारांचं बरचसं काम सोपं करतं. विशेष म्हणजे, कंबोडिया हा जगातला सर्वात जास्त भूसुरुंग असलेल्या देशांपैकी एक आहे, 1,000 चौ. कि.मी.पेक्षा जास्त जमीन अजूनही दूषित आहे. तर 40,000हून अधिक लोकांनी भुसुरूंग स्फोटकांमुळे आपले हातपाय गमावले आहेत.