मानवी जीवन गुंतागुंतीचं आहे. भावभावनांनी भरलेलं आहे. नातीगोती आणि मित्रमंडळी या पसाऱ्यात हे जीवन गुंतलेलं असतं. आजारपणात हीच नाती कामाला येतात. असाच काहीसा अनुभव अर्जुन सेन यांना आला. कॅन्सर झाल्याने अर्जुन सेन शेवटची घटका मोजत होते. आता आपण राहणार नाही याची त्यांनाही जाणीव झाली. नातेवाईक आणि मित्र येऊन त्यांना भेटून जात आणि दु:खी होत. आपला मित्र, आपला आप्तेष्ट आता आपल्यात राहणार नाही याची त्यांना कुणकुण लागे. पण नशीब बलवत्तर असेल तर काहीच होत नाही, असं म्हणतात तेच खरं आहे. अर्जुन यांच्याबाबत असंच घडलं. मुलीने एकच सवाल केला, बेडवर शेवटची घटका मोजणाऱ्या अर्जुन यांच्या काळजात हा सवाल भिडला आणि…
माझं वय तेव्हा फक्त 32 होतं. माझी एक मिटिंग सुरू होती. त्यावेळी अचानक मला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे मला तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आलं. मिटिंग घेत असताना माझं जग वेगळं होतं. पण रुग्णालयात भरती झाल्यावर माझं जगच बदलून गेलं. एका क्षणापूर्वी मी प्रमोशन मिळवत होतो, आणि दुसऱ्या क्षणाला माझ्या मेडिकल रिपोर्ट्समध्ये “कॅन्सर” असं लिहिलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं, “अर्जुन, तुमच्याकडे 100 दिवसांपेक्षा कमी वेळ आहे.” 100 दिवस – फक्त. अगदी एक दिवस आधी मी स्वतःला विजेता मानत होतो आणि दुसऱ्या दिवशी ही परिस्थिती होती…
त्यानंतर डॉक्टरांनी माझ्यासमोर दोन पर्याय ठेवले. कॅन्सरला जिंकू द्यायचं किंवा जो वेळ उरला आहे, त्याचा सर्वोत्तम उपयोग करायचा. मी दुसरा पर्याय निवडला. पण हे सोपं नव्हतं. मला स्वतःला या परिस्थितीला स्वीकारण्यात अवघड जात होतं. आपल्या कुटुंब आणि मित्रांना हे सांगणं तर अगदी जास्त कठीण होतं. मी अमेरिकेत होतो आणि फोनवर कुटुंबीयांना सर्व सांगितलं. काही लोक रडत होते, तर काहींनी सहानुभूती व्यक्त केली. नंतर नंतर तर अशी वेळ आली की मला लोकांशी बोलण्याची भीती वाटायला लागली. “We are sorry,” किंवा “That’s sad” असे शब्द ऐकायला मला अजिबात आवडत नव्हते कारण यामुळे परिस्थिती आणखी कठीण होत होती…
या सर्वात मला एक गोष्ट अधिक मनात रुतली. ती म्हणजे माझ्या मुलीचा सवाल. डॅड, तुम्ही मरणार आहात का?, तुम्ही माझ्या लग्नात असणार का? मुलीने मला हे दोन प्रश्न विचारले आणि एका क्षणात माझ्या जीवनात बदल झाला. आधी मी आहे तेवढे दिवस जगण्याचा पर्याय स्वीकरला होता. पण मुलीच्या प्रश्नाने मला लढायला बळ मिळालं. मला कॅन्सरशी लढा द्यावा लागेल, याची मला जाणीव झाली. नंतर त्या दिवसापासून मी हेल्दी डाएट घ्यायला सुरुवात केली. वेळेवर चेक-अप करायला लागलो. कर्ज घेतलं आणि सर्वोत्तम उपचारासाठी पैसे मिळवले. खरं तर, डॉक्टर आणि नर्सने सांगितलं होतं की, कॅन्सर तुम्हाला मारणार नाही, निराशा तुम्हाला मारेल.
या जीवन मरणाच्या प्रसंगात माझे मित्र आणि रुग्णालयातील कर्मचारी माझे सर्वात मोठे आधार होते. आमचा भविष्याचा कॅन्सर विजेता कसा आहे? (How’s our future cancer winner doing today?), असं ते मला म्हणायचे. जसे 100 दिवस जवळ येत होते, मला खूप सुधारणा वाटू लागली. त्या दिवसांमध्ये, मी पुस्तकं लिहायला सुरुवात केली, लोकांशी संवाद साधायला लागलो आणि आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवायला लागलो.
एकदा प्रसिद्ध दिग्दर्शक शूजित सरकार माझ्याकडे आले. माझ्या जीवनावर चित्रपट बनवण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. पण मला ते योग्य वाटलं नाही. मी नाही म्हणून सांगितलं. पण पुन्हा माझी मुलगीच समोर आली. ती म्हणाली, पापा, तुम्ही याबद्दल बोललं पाहिजे, यामुळे दुसऱ्यांना मदत होईल. मुलीच्या सांगण्यावरून मी होकार दिला. आज 25 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मी कॅन्सरला हरवलं आहे आणि यावर पुस्तकं देखील लिहिलं आहे, ज्यामुळे दुसऱ्यांना मदत होईल. अभिषेक बच्चन याने अभिनय केलेला आय वॉन्ट टू टॉक यू… हा सिनेमा माझ्या जीवनावर आधारीत आहे. आज मला समाधान मिळतं. जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे, दिवसात जीवन जोडा, जीवनात दिवस नका जोडू, असं ते सांगतात.