मुंबई : अशी लचकत, मुरडत, झुलवत… आले मी… नुसती धून ऐकली तरी पाय थिरकू लागतात आणि ओठ गुणगुणू लागतात. चंद्रमुखी सिनेमातील चंद्रा (Chandra song Chandramukhi movie) या गाण्याने सर्वानांच वेड लावलं आहे. आजवर या गाण्यावर अनेकांनी ठेका धरला याचे व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. मात्र, एका लहान मुलाने हे संपूर्ण गाणंच गायलं आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. या मुलाने चंद्रा गाणं इतकं भारी गायलयं की व्हिडिओ एकदा पाहिल्यावर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहतचं रहावसं वाटत आहे.
जिल्हा परिषद शाळेचा हा विद्यार्थी आहे. त्याच्या शाळेतील शिक्षकाने त्याचा हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. मुलाचे टॅलेंट पाहून सरांनी हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे.
चंद्रमुखी सिनेमा 29 एप्रिलला रिलीज झाला. अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात चंद्रा ही लावणी आहे. अमृता खानविलकरने यावर नृत्य केले आहे. सिनेमातील चंद्रा हे गाणं चांगलच हिट ठरलं आहे. गायिका श्रेया घोषालने गायलेले हे गाणं अजय-अतुल या जोडीने संगीत बद्ध केले आहे.
एखाद्या प्रख्यात गायका प्रमाणे अतिशय अप्रतिम असं हे गाण या विद्यार्थ्याने गायलं आहे. या निमित्ताने चंद्रा या गाण्याचे मेल व्हर्जन ऐकायला मिळाले आहे. जयेश खरे असं हे गाण गाणाऱ्या मुलाचे नाव आहे.
कृष्णा राठोड या शिक्षकाने हा व्हिडिओ त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, करजगाव या शाळेत बदली झाल्यानंतर इयत्ता सहावीच्या वर्गावर गेलो.विद्यार्थ्यांची ओळख झाल्यानंतर त्यांच्यातील विशेष गुणांची तपासणी करत असताना जयेश खरे नावाच्या विद्यार्थ्यांनी एक अप्रतिम गाणं सादर केले..गाणं ऐकल्यानंतर पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचं एक वाक्य आठवलं या मातीमध्ये अनेक प्रकारची रत्ने तुम्हाला सापडतील फक्त ती माती ढवळण्याची गरज आहे असं कॅप्शन या शिक्षकाने दिले आहे.
जयेशचा हा व्हिडिओ फेसबुकवर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. अनेक जण कमेंट् करत जयेशच्या टॅलेंटचे कौतुक करत आहेत. तसेच त्याला भविष्यात योग्य प्रकारचे मार्गदर्शन मिळावे अशी देखील मागणी करत आहेत.