निमंत्रण आहे की धमकी ? जोडप्याचं वेडिंग कार्ड वाचून पाहुणे गोंधळात

| Updated on: May 15, 2024 | 3:44 PM

लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांचा खूप आदर राखला जातो, त्यांची सरबराई केली जाते. पण एका जोडप्याने असं काही केलं ज्यामुळे त्यांचं लग्न हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. या जोडप्याने लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसमोर अशा अटी ठेवल्या की बहुतेकांनी लग्नाला उपस्थित राहण्याचा त्यांचा बेतच रद्द केला.

निमंत्रण आहे की धमकी ? जोडप्याचं वेडिंग कार्ड वाचून पाहुणे गोंधळात
Follow us on

लग्न म्हटलं की मजा-मस्ती यासोबतच रुसवे-फुगवे आलेच. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांचा खूप आदर राखला जातो, त्यांची सरबराई केली जाते. पण आपलं लग्न अविस्मरणीय बनवण्याच्या नादात एका जोडप्याने असं काम केलं की, आता सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची जगभरात चर्चा होत आहे. लग्नात पाहुण्यांच्या वागण्याचं वाईट वाटलं तरी घरातील सदस्य त्याकडे दुर्लक्ष करतात हे तुमच्या लक्षात आले असेल. पण या ब्रिटीश जोडप्याने पाहुण्यांसमोर अशा अटी ठेवल्या की त्या वाचून बहुतेक लोकांनी लग्नाला येण्याचा बेतच रद्द केला.

खरंतर या जोडप्याने छापलेली लग्नपत्रिका वाचून पाहुण्यांना धक्काच बसला. लग्नपत्रिकेत ज्या गोष्टी नमूद केल्या आहेत, त्यानुसार लग्नाला येणारे पाहुणे या जोडप्याच्या काही अटी मान्य करण्यास तयार असतील तरच ते लग्नाला उपस्थित राहू शकतात. आता हे विचित्र कार्ड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.

असं काय आहे त्या पत्रिकेत ?

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, या जोडप्याचे नाव समोर आलेले नाही, परंतु रेडिटवर त्यांच्या लग्नाच्या पत्रिकेची (wedding card) मात्र जोरदार चर्चा सुरू आहे. r/weddingshaming अकाउंटवरील एका युजरने लग्नपत्रिकेचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, जर कोणी मला असे आमंत्रित केले तर मी त्या लग्नाला अजिबात जाणार नाही. खरंतर, या पत्रिकेत पाहुण्यांसाठी एक-दोन नव्हे तर तब्बल 15 अटी लिहिल्या होत्या. जे वाचून लोक संतापले. हे आमंत्रण आहे की धमकी ? असाच प्रश्न अनेक लोकांना पडला आहे.


या जोडप्याने पाहुण्यांना स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की, हा (लग्नाचा) त्यांचा (जोडप्याचा) खास दिवस आहे, तुमचा नाही. त्या पत्रिकेत अनेक नियम आणि अटी स्पष्ट केल्या आहेत, ज्या अंतर्गत लग्नासाठी येताना लोकांनी थीम ड्रेसशिवाय दुसरे काहीही परिधान करण्याची चूक करू नये. तसेच फोटोग्राफरच्या मध्येही येऊ नका. ज्या व्यक्तीची जिथे बसण्याची सोय केली असेल त्याने तिथेच बसावे. एखाद्याला लग्नातलं संगीत आवडलं नाही तर ती व्यक्ती उठून सरळ घरी जाऊ शकते, असेही या जोडप्याने पत्रिकेत स्पष्ट केलं आहे. त्याशिवाय इतरही अनेक अटी आहेत, ज्या वाचून पाहुण्यांचे अक्षरश: गोंधळून गेलेत.