Electric Scooter | केरळ वाहतूक पोलिसांचा (Kerala Traffic Police) एक मोठा कारनामा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) मालकाकडे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) नसल्याने पोलिसांनी त्याला ई-चलान दिले. या ई-चलानचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या फोटोवरुन हे चलान या 6 सप्टेंबर रोजी जारी केल्याचे स्पष्ट होत आहे. केरळ राज्यातील मलप्पुरम जिल्ह्यातील नीलांचेरी येथे हा प्रकार घडला. युजर्सनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Union Transport Minister Nitin Gadkari) यांच्याकडे याप्रकरणात अपील दाखल केले आहे.
मीडिया रिपोर्टसनुसार, इलेक्ट्रिक स्कूटर अथर 450X च्या मालकाला ई चलान देण्यात आले. ही ई-स्कूटर 2018 मध्ये बेंगळूरुमधील कंपनीने बाजारात दाखल केली. या कंपनीच्या ई-स्कूटरची ही तिसरी पिढी आहे.
अथर स्कूटर 5.4 kW ब्रशलेस इलेक्ट्रिक मोटर आणि 2.4 kWh लिथियम-आयन बॅटरीवर चालते. ही स्कूटर 3.9 सेकंदात शून्य ते 40 किमी/ तासाचा वेग पकडू शकते. ताशी 80 किमी/प्रति तास या सर्वोच्च वेगाने ही स्कूटर धावते. एकदा चार्जिंग केल्यावर ही स्कूटर 75 किमीपर्यंत धावू शकते.
केरळ पोलिसांनी ई-चलान दिले आहे. त्यानुसार, हे 250 रुपयांचे चलान आहे. मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या नियम 213(5)(ई) नुसार हा दंड लावण्यात आला आहे.
असा विचित्र प्रकार काही पहिल्यांदाच झालेला नाही. जुलै महिन्यात केरळ मध्येच दुचाकीत योग्य प्रमाणात इंधन नसल्याच्या कारणावरुन दंड लावल्याचा प्रकार घडला होता.