प्रत्येक शहरात जुन्या वस्तूंचा बाजार, दुकाने हमखास आढळतात. आता तर ऑनलाईन पण अनेक जण जु्न्या वस्तूंची खरेदी-विक्री करतात. वडिलांना जुन्या कॅमेरा खरेदी करण्याची आवड होती. म्हणाल तर शौक होता. जुने कॅमेरे त्यांच्या संग्रही होते. मुलाने मग वाढदिवसाला त्यांना एक जुना कॅमेरा आणून दिला. त्यात 50 वर्षांपूर्वीचे ते खास क्षण चित्रबद्ध होते.
डेलि स्टार न्यूज साईटवरील वृत्तानुसार, केंब्रिजमधील रहिवाशी डेव्हिड विंडर (David Winder) 54 वर्षांचे आहेत. त्यांना जुने कॅमेरे खरेदीची आवड आहे. त्यांना त्यातून छायाचित्र काढणे आवडते. त्यांचा मुलगा नोआह याला ही गोष्ट माहिती असल्याने त्याने वडीलांच्या वाढदिवशी लिव्हरपूल येथील एका जुन्या दुकानातून जूना कॅमेरा खरेदी केला आणि वाढदिवसाला भेट म्हणून दिला. हा कोडॅक कंपनीचा ब्राऊनी क्रेस्टा 3 हा कॅमेरा होता. तो 1960 ते 1965 या काळातील असावा.
कॅमेऱ्यात सापडला फिल्म रोल
तर या कॅमेऱ्यात डेव्हिड यांना एक फिल्म रोल दिसला. तो सहाजिकच अत्यंत जूना होता. तो सुस्थितीत पाहून त्यांना आनंद झाला. कॅमेऱ्यासोबतच कोणाच्या तरी आठवणींचा ठेवा होता. कॅमेरा 50 वर्षांपूर्वीचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. म्हणजे साधारणत: जो फिल्म रोल होता तो 1970 ते 1980 या काळातील असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांनी हा रोल डेव्हलप करण्याचे ठरवले. त्याचे फोटो आल्यावर त्यांना आनंद झाला.
एका कुटुंबाच्या आठवणींचा ठेवा
छायाचित्र समोर आले तेव्हा डेव्हिड यांना आनंद झाला. या फोटोत त्यांना एक कुटुंब आढळले. ते सुट्टी साजरी करण्यासाठी बहुधा इंग्लंडमधील मर्सीसाईड भागात आले होते. त्यांनी फोटो काढले आणि ते डेव्हलप करण्याचे ते विसरून गेले. पुढे बहुधा कॅमेऱ्यासहीत रोल तसाच राहिला. आता डेव्हिड यांना हा आठवणींचा ठेवा त्या कुटुंबाला परत करायचा आहे. त्यांनी हे फोटो फेसबुकला पोस्ट करून त्याच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. आनंदाचे क्षण किती अविस्मरणीय असतात हे त्या कुटुंबाला त्यांना दाखवायचे आहेत.