मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : मुंबईची लाईफ लाईन लोकल ट्रेन मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. या लोकलमध्ये मुंबईकरांचे प्रवासाचे अनेक तास व्यतित होतात. त्यामुळे मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन म्हणजे दुसरे घर झाले आहे. सोशल मिडीयावर लोकलचे अनेक व्हिडीओ शेअर केले जातात. त्यात लोकलमध्ये पब्लिक दांडीया खेळताना, स्टंट करताना तर कधी डान्स करताना मुंबईकर दिसत असतात. तर कधी कधी गर्दीत सीटवरून किंवा धक्का लागल्याने सुरु असलेल्या मारामारीचे व्हिडीयो पाहायला मिळतात. अलिकडेच लोकलचा एक अनोखा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दोन ब्लॉगर्स लोकल ट्रेनच्या डब्यात एक छोटे तात्पुरते रेस्टॉरंट उघडल्याचे दिसत आहेत. प्रवासी देखील या रेस्टॉरंटचा पाहुणचार घेताना दिसत आहेत.
आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल हे कसे काय शक्य आहे. धावत्या लोकलमध्ये रेस्टॉरंट कसे काय उघडता येऊ शकते. सोशल मिडीया प्लॅटफॉर्म इस्टाग्रामवर व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला या रेस्टॉरंटची कल्पना येईल आणि तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतीस. दोन तरुणांनी ‘टेस्टी तिकीट’ नावाच्या रेस्टॉरंटची काही आमंत्रण पत्रिका छापल्या. त्यानंतर या आमंत्रण पत्रिकांना रेल्वे स्थानकावर बसलेल्या प्रवाशांना वाटण्यात आले. त्यानंतर कार्डवर छापलेल्या तारखांप्रमाणे रेस्टॉरंटची ओपनिंगही करण्यात आली. या रेस्टॉरंटच्या ओपनिंग निमित्त प्रवाशांना मोफत जेवण देण्यात आले.
येथे पाहा व्हिडीओ –
व्हिडीओत आपण पाहू शकता की सर्वात आधी दोन तरुणांनी एका प्रवाशाला जिलेबी वाढली. या जिलेबीवर त्यांनी ओरिगॅनो टाकून ती सर्व्ह केली. त्यानंतर मॅगीवर केचअप टाकून ती सजवून वाढण्यात आली. शेवटी डेझर्ट वाढण्यात आले. सर्वात शेवटी प्रवाशांच्या प्रतिक्रीया घेण्यात आल्या. या व्हिडीओला खूप पाहिले जात आहे आणि पसंद केले जात आहे. युजरने वेगवेगळ्या प्रतिक्रीया यावर दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की कोणत्या स्टेशनात भेटशील भावा ? दुसऱ्या एका युजरने लिहिलेय अशा आयडीया येतात कुठून ? तिसऱ्या युजरने लिहीलंय, भावा तू मला कधी दिसला नाहीस ते ?