हरिद्वार, लग्नाच्या मंडपातून नवरदेवाने धूम ठोकल्याच्या घटनांबद्दल आपण बऱ्याचदा ऐकतो. या मागचे कारण बहुदा प्रेम प्रकरण असतं मात्र धर्मनगरी हरिद्वारमध्ये एक जगावेगळी घटना पाहायला मिळाली. लग्न झाल्यानंतर एका नवरदेवाने मंडपातून धूम ठोकली, मात्र त्यामागचे कारण फारच वेगळे आणि तितकेच महत्वाचे होते. लग्नाच्या मंडपातून नवरदेव थेट एलएलबीची परिक्षेसाठी थेट कॉलेजला गेला आणि त्याची वधू बाहेर कारमध्ये थांबली होती. परीक्षा संपताच, वर बाहेर आल्यावर वधूच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य दिसले, कारण तिच्या नवऱ्याने त्यांच्या नवीन आयुष्याची तसेच तिच्या भविष्याची चिंता करत एलएलबीच्या परिक्षेला प्राधान्य दिले (Groom In Exam Hall). हरिद्वार श्यामपूर कांगरी गाजीवाला येथील रहिवासी असलेल्या तुलसी प्रसादचे हरियाणातील हिसार येथे लग्न झाले. एलएलबीचा पेपर असल्याने नवरीकडच्यांचा निरोप घेऊन घरी न जाता तो आधी एलएलबीचा पेपर देण्यासाठी आला.
तुलसी प्रसाद याने सांगीतले की, माझं लग्न हिस्सारला झालं पण दुसऱ्याच दिवशी एलएलबीचा पेपर होता, मी थेट घरी गेलो असतो तर उशीर झाला असता, म्हणून मी थेट पेपर द्यायला कॉलेजमध्ये आलो. लग्नाचे विधी आता घरी जाऊन पूर्ण केले जातील. वधूला घेऊन पेपरला जाणे मला विचित्र वाटले, पण पेपर देणेही गरजेचे होते, असे तो म्हणाला. पूर्णानंद तिवारी लॉ कॉलेजचे प्राचार्य अशोक कुमार तिवारी सांगतात की, ज्या विद्यार्थ्याने पेपर दिला होता त्याचा एलएलबी 5 व्या सेमिस्टरचा पेपर होता. पेपर सोडला असता तर त्यांचे एक वर्ष वाया गेले असते, म्हणून त्यांनी लग्नाच्या कपड्यांमध्ये पेपर देण्याची परवानगी मागितली.
मुख्याध्यापक पुढे म्हणाले, “लग्नानंतर तुलसीप्रसाद घरी न जाता थेट कॉलेजमध्ये पेपर देण्यासाठी गेला. नव्या आयुष्याची सुरुवात करताना त्याने पहिले पेपरला प्राधान्य दिले. ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यासोबत त्याची वधूही आली आणि गाडीत तिच्या वराची वाट पाहत राहिली. लग्नानंतर तुलसीप्रसादने आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. भविष्याच्या चिंतेत प्रथम एलएलबीचा पेपर देण्यासाठी कॉलेज गाठले. तुलसीप्रसादच्या या निर्णयाचे सर्वांनी कौतुक केले, कारण त्याने आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात उज्ज्वल करण्यासाठी शिक्षणाला प्राधान्य दिले.