हरयाणातील करनाल येथील पंजाब नॅशनल बँकेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला. महिला खातेदार आली. तिने शाखा व्यवस्थापकाला तिचे नाव आणि लॉकर क्रमांक सांगितला. त्यानंतर पुढे जे घडले, ते तुम्ही सुद्धा वाचणे आवश्यक आहे. तुमची रक्कम, दागिने खरंच बँकेत सुरक्षित आहेत का? काय आहे हा प्रकार? काय झाले बँकेत? मॅनेजरला का फुटला घाम, कशामुळे वळली त्याची बोबडी?
पंजाब नॅशनल बँकेत एक महिला आली. तिने शाखा व्यवस्थापकाला तिचे नाव आणि लॉकर क्रमांक सांगितला. पण बँकेच्या लॉकरमधून अनेक तोळे सोने गायब झाल्याचे तिचे म्हणणे होते. पूर्वी तिचे खाते ओबीसी बँकेत होते. त्याच बँकेत तिचे लॉकर होते. त्यात तिने सोने ठेवले होते. नंतर हे खाते पंजाब नॅशनल बँकेत समाविष्ट झाले. तिचे लॉकर आणि सोने सुद्धा पंजाब नॅशनल बँकेकडे आले. घरात लग्न कार्य असल्याने आता तिला सोन्याच्या दागिन्यांची गरज होती. म्हणून ती बँकेत आली होती.
लॉकरमधून सोने गायब
या महिलेने दावा केला की, तिच्या लॉकरमधील सोने गायब आहे. लॉकरमध्ये 30 ते 35 तोळे सोने होते. तिला दोन बहिणी आहेत. या तिघींचे सोने लॉकरमध्ये होते. ओबीसी बँकेतून सोने आणि लॉकर पंजाब नॅशनल बँकेत हस्तांतरीत करण्यात आले होते. त्यानंतर महिला सोने घेण्यासाठी आल्यावर हा प्रकार समोर आला. त्यानंतर त्यांनी 112 क्रमांकावर तक्रार नोंदवली. पोलिसांची टीम तात्काळ बँकेत पोहचली. त्यांनी याविषयी चौकशी केली.
लॉकरमधून या महिलांचे सर्वच सोने गायब झाले नाही. तर ज्या मोठ्या पर्समध्ये मोठे दागिने होते. तेच गायब झाले तर छोट्या पर्समध्ये असलेले छोटे सोने आणि चांदीचे दागिने तसेच आहेत. त्यांना हात लावण्यात आलेला नाही. पण मोठ्या पर्स गायब झाल्या आहेत. याप्रकरणी स्थानिक शहर पोलीस ठाण्यात वर्दी देण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.
महिलांनी शाखा व्यवस्थापक आणि अधिकार्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली असता, त्यांनी कानावर हात ठेवले. या प्रकाराबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचे बँकेतील कर्मचार्यांचे म्हणणे आहे. पोलीस आता याप्रकरणात पुढील तपास करत आहेत. पीडित महिलांच्या परिसरात चोरींच्या घटना सातत्याने घडतात. त्यामुळे सुरक्षित ठिकाणी सोने ठेवण्यासाठी त्यांनी बँक लॉकरचा पर्याय निवडला होता.