चंडीगड | 29 नोव्हेंबर 2023 : हरियाणातील रेवाडी येथे एका इसमाने आपल्या भाचीच्या लग्नात हिंदू रितीरिवाजांनुसार शगुन देताना असा आदर्श ठेवला आहे, ज्याची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. देशभरात या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून लोक चर्चा करत आहेत. या इसमाने त्याच्या विधवा बहिणीच्या घरी नोटांचा जणू डोंगरच रचला. त्याने शगुन म्हणून 1 कोटी, 1 लाख, 11 हजार 101 रुपये रोख दिले. एवढेच नाही तर कोट्यवधी रुपयांचे दागिनेही दिले. लग्नातील शगुन म्हणून दिलेल्या या रोख रकमेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
एकुलत्या एका भाचीसाठी काहीपण
मिळालेल्या माहितीनुसार, सतबीर असे या इसमाचे नाव आहे. तो मूळचा आसलवास गावचा रहिवासी आहे. सतबीर यांच्या एकुलत्या एका बहिणीचे लग्न झाले आणि त्या सिंदपूरमध्ये रहायला गेल्या. मात्र लग्नानंतर काही काळातच त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यांना एक मुलगी आहे. तिच्या लग्नाचे विधी सुरू होते. आपल्या एकुलत्या एका भाचीच्या लग्नासाठी सतबीर हे आपल्या बहिणीच्या घरी त्याच्या गावातील लोकांसह भात ( एक विधी) करण्यासाठी पोहोचले. मात्र संध्याकाळी या विधीली सुरूवात झाल्यानंतर समोर जे दिसलं ते पाहून सगळेच लोक दंग झाले.
सतबीर यांनी एकुलत्या एका भाचीसाठी 500-500 रुपयांच्या नोटांचा डोंगरच रचला. त्यांनी तब्बल 1 कोटी, 1 लाख, 11 हजार 101 रुपयांची रोख रक्कम शगुन म्हणून भाचीला दिली. एवढेच नव्हे तर कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि इतरही भरपूर सामानही त्यांनी भाचीला भेटीदाखल दिले. या संपूर्ण विधीचा आणि शगुन म्हणून दिलेल्या रकमेचा व्हिडीओ शूट करण्यात आला असून तो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
1 कोटी, 1 लाख, 11 हजार 101 रुपये दिले रोख
भाचीला ही अनोख भेट देणाऱ्या सतबीर यांचा स्वत:चा क्रेनचा व्यवसाय असून ते कुटुंबासह गावात राहतात. तसेच त्यांच्याकडे बराच जमीन-जुमलाही आहे. वर नमूद केल्याप्रमाणे सतबीर यांच्या बहिणीच्या पतीचे खूप लौकर निधन झाले. त्यामुळे सतबीर हे पहिल्यापासूनच त्यांच्या एकुलत्या एका बहिणीच्या मदतीसाठी तत्पर असतात. अशातच जेव्हा त्यांच्या बहिणीच्या एकुलत्या एका मुलीचे आणि त्यांच्या एकुलत्या एका भाचीचे लग्न आहे, तेव्हा तर त्यांनी खुल्या हाताने खर्च केला. भाचीला शगुन देताना त्यांनी असा आदर्श स्थापित केला, की ज्याची आता फक्त गावातच नव्हे तर व्हायरल व्हिडीओमुळे संपूर्ण देशातही चर्चा होत आहे. रेवाडीच्या दिल्ली-जयपूर हायवेला लागून असलेल्या असलवास गावात राहणाऱ्या सतबीरच्या बहिणीचे लग्न सिंदरपूरमध्ये होते. सध्या ती तिच्या कुटुंबासोबत पडैय्याजवळ राहत आहे.