पारावरच्या गप्पांमध्ये, रात्री एखाद्याच्या ओट्यावर आपण अनेकदा भुताटकीच्या गोष्टी ऐकतो. आपल्या गावात, शहरात सुद्धा अशी काही ठिकाणं असतात की तिकडं कोणी सहजासहजी फिरकत नाही. अमावस्येला तर त्या भागात अघोषीत संचार बंदी असते. हैदराबाद शहरात पण अशीच वास्तू आहे. खैरताबाद विज्ञान महाविद्यालय, याविषयीच्या असंख्य दंतकथा आणि भुताटकीच्या कथा आहेत. शहरातील भीतीदायक जागांमध्ये या कॉलेजचा समावेश होतो. एके काळी ही जागा विद्यार्थ्यांनी फुलून जायची. येथे विज्ञान शाखेचे विद्यार्थी शिक्षण घेत असत. आता या भागात भुताटकी होते, असं म्हटलं जातं. पण यात काही तथ्य नाही. कोणीही त्याबाबतचा दावा केला नाही.
रात्री या भागात नाही येत कोणी
स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, हे खैरताबाद विज्ञान कॉलेज सुरू असताना, या इमारतीचा एक भाग कोसळला होता. त्यानंतर हे कॉलेज बंद करण्यात आले. पण विविध अफवांमुळे येथे कोणी फिरकत नाही. लोकांनी अशी अफवा पसरवली आहे की रात्री या परिसरात काही विचित्र आवाज येतात. भीतीदायक आवाजामुळे या परिसरात कोणी येत नाही.
विना परवानगी मृतदेहांचे परीक्षण
या कॉलेजशी संबंधित अजून एक कहाणी आहे. जेव्हा येथे शिक्षण देण्यात येत होते, तेव्हा येथील प्रयोगशाळेत मृत मानवी शरीरांचे परीक्षण करण्यात येत होते. त्यावेळी कोणी त्याची परवानगी सुद्धा घेत नव्हते असा दावा करण्यात येतो. जेव्हा सरकारला या गोष्टीची कुणकुण लागली तेव्हा ही प्रयोगशाळा बंद करण्यात आली. स्थानिक असा दावा करतात की अनेकांचे मृतदेह नष्ट न करता, शरीराला मुठमाती न देता तसेच ठेवण्यात आल्याने आत्मा भटकतात. पण त्यात कितपत तथ्य आहे हा संशोधनाचा विषय आहे.
सुरक्षा रक्षक नाही वाचला
भुताटकीच्या घटना वाढल्यानंतर या भागात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला. पण काही दिवसांनी त्याचा मृतदेहच कॉलेज इमारतीच्या आत सापडला. एका रात्री त्याला कॉलेजमधून सारखे आवाज येत असल्याने तो आता गेला. नंतर तो कधीच जीवंत बाहेर आला नाही. त्याचा मृतदेहच बाहेर आला, असा दावा करण्यात येतो. या घटनेने एकच खळबळ उडाली. कोणतीही शहानिशा न करता भुताटकीने तो मेल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर या परिसरात आता दिवसा सुद्धा फारशी लोकं जात नसल्याचे सांगण्यात येते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)