दिल्ली : दिल्लीच्या एका फाईव्ह स्टार ( Five Star Hotel ) हॉटेलात एका पाहुण्याने तब्बल दोन वर्षांचा मुक्काम करीत तब्बल 58 लाखांचे बिल करुन तो पसार झाल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे त्याने हॉटेलच्या आतील कर्मचाऱ्याशी संगनमत करुनच हॉटेलची फसवणूक केल्याचे म्हटले जात आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ( Indira Gandhi International Airport ) बाजूलाच असलेल्या एयरोसिटी जवळील हॉटेल रोजीएट हाऊस ( Roseate House ) या प्रकरणात आयजीआय एअरपोर्ट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
रोजिएट या पंचतारांकित हॉटेलाचे व्यवस्था पाहणाऱ्या बर्ड एअरपोर्ट हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड लिमिटेडचे अधिकृत प्रतिनिधी विनोद मल्होत्रा यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्यात म्हटले आहे की अंकुश दत्ता यांना हॉटेलमध्ये 603 दिवसांचा मुक्काम केला होता. ज्याचे बिल 58 लाख इतके झाले आहे. परंतू हॉटेल सोडताना त्याने कोणतेही बिल भरलेले नाही, त्यामुळे या पंचतारांकित हॉस्पिटलचे प्रचंड नुकसान झाले आहे.
या पंचतारांकित हॉटेलचे फ्रंट ऑफिस विभागाचे प्रमुख प्रेम प्रकाश यांनी नियमांचे उल्लंघन करीत दत्ता याला बेकायदेशीर रित्या दीर्घकाळापर्यंत वास्तव्याची मंजूरी दिल्याचा आरोप हॉटेल प्रशासनाने लावला आहे. प्रकाश यांच्यावर हॉटेलचे भाडे ठरविण्यासंदर्भातील कार्यभार सोपविण्यात आला होता. त्याला सर्व पाहुण्याचे भाडे आणि सर्व संगणकीय प्रणाली वापरण्याचे अधिकार होते. प्रकाश याला अंकुश दत्ता याने काही पैसे दिले असावेत असा हॉटेल प्रशासनाला संशय आहे. अंकुश दत्ता याला जास्त काळ रहाता यावे यासाठी प्रेम प्रकाश याने इतर कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन कट रचल्याचा आरोप हॉटेल प्रशासनाने केला आहे.
हॉटेल प्रशासनाने दावा केला आहे की अंकुश दत्ता 30 मे 2019 रोजी या हॉटेलात एक रात्र रहाण्याच्या नावाखाली रुम बुक केलेला होता. दत्ताला दुसऱ्या दिवशी हॉटेल चेक इन करायचे होते. परंतू हा पाहुणा 22 जानेवारी 2021 पर्यंत हॉटेलमध्ये तळ ठोकून होता. हॉटेलने या दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आयजीआय पोलिसांना केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी सुरु केली आहे.