नवी दिल्ली | 6 ऑक्टोबर 2023 : क्रिकेट विश्वचषकाचा श्रीगणेशा झाला आहे. देशभरात क्रिकेटचा फिव्हर दिसून येत आहे. क्रिकेटचा महाकुंभ (ICC World Cup 2023) भरला आहे. आता दीड महिना देशात उत्सवाचे वातावरण राहील. सणासुदीचा आनंद द्विगुणीत होणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला त्यामुळे चालना मिळेल. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापेक्षा भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामना खरा भाव खाऊन जातो. या सामन्यातून मोठी कमाई होण्याची शक्यता आहे. हा सामना गुजरातमधील अहमदाबाद येथे रंगणार आहे. विमानाची तिकटं महागल्याने विमान कंपन्यांची तर चंगळ झाली आहे. आता भारतीय रेल्वे (Indian Railway) पण या सामन्यातून कमाई करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी रेल्वेचे खास नियोजन करण्यात येणार आहे.
या दिवशी रंगणार सामना
14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान भिडणार आहेत. या टीममध्ये गेल्या काही दिवसांपासून कट्टरतेची भावना कमी दिसत असली तरी या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या दिवशी सर्वच क्रिकेट प्रेमीचे चित्त सामन्याकडे असेल. अहमदाबादमधील या सामन्यात कोण बाजी मारते हे समोर येईल.
अहमदाबादसाठी विशेष ट्रेन
क्रिकेट चाहत्यांसाठी भारतीय रेल्वेने अहमदाबादला जाण्यासाठी विशेष वंदे भारत ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यासाठी स्पेशल वंदे भारत ट्रेन सोडण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. ही विशेष रेल्वे अगदी अचुक वेळेवर धावेल आणि ती सामन्यापूर्वी अहमदाबादला पोहचेल. तसेच सामना संपल्यानंतर क्रिकेट प्रेमींना त्यांच्या शहराला जवळ करता येईल. त्यासाठी या ट्रेनेच्या योग्य वेळेचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अहमदाबाद येथे थांबण्याची गरज नाही. तुमचा हा खर्च वाचेल.
आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 शेड्यूल
या विश्वचषकासाठी एकूण 48 सामने खेळण्यात येत आहे. यापूर्वीचा विजेता इंग्लंड आणि न्युझीलंड यांच्यामध्ये पहिला सामना 5 ऑक्टोबर 2023 रोजी खेळला गेला. भारत आणि पाकिस्तानमधील चुरशीचा सामना 14 ऑक्टोबर 2023 रोजी अहमदाबादमध्ये होईल. अनेक सामने दिवस-रात्रीत होतील.
वंदे भारत ट्रेनचा विशेष लूक
भारतीय चाहते आणि टीम इंडियाचा उत्साह वधारण्यासाठी वंदे भारत ट्रेन तिरंग्याच्या रंगात रंगात रंगणार आहे. या ट्रेनमध्ये देशभक्तीपर गाणी वाजवणार आहेत. भारतीय रेल्वेसह गुजरात मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सामन्याची तयारी केली आहे. सामन्याच्या दिवशी मेट्रो ट्रेनची वेळ वाढविण्यात येणार आहे.