जयपूर : सोशल मीडियावर रोज कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला होतं. तर व्हिडीओ पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. असाच एक जयपूरमधील प्रेमी युगुलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चालत्या बुलेटवरील प्रेम पाहून पोलिसांनीही डोक्यावर हात मारला आहे. पोलिसांनी कारवाई करत मुलाची ओळख पटवत बुलेट जप्त केली आहे. तसेच वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडीओच्या आधारे बाइकचा नंबर लिहून घेतला. त्यानंतर सदर बुलेट सांगानेरच्या रामचंद्रपुरा भागात राहणाऱ्या हनुमान सहाय याची असल्याचं कळलं. पोलिसांनी तात्काळ आपल्या तपासाची सूत्र हलवली. वाहतूक पोलीस अधिकारी गिरीराज प्रसाद आणि हवालदार बाबूलाल हे दोघं हनुमान सहाय याच्या घरी कारवाईसाठी पोहोचले. तसेच बुलेट नंबर क्रॉस चेक करून तपास सुरु केला.
The boy is driving the car and the girl is sitting on the petrol tank of the Bullet. The video of their romance has gone viral.#Jaipur #viralvideo pic.twitter.com/FdiQOrGSYk
— Reema (@_R_E_EM_A) March 8, 2023
पोलिसांनी त्याची चौकशी सुरु करताच तरुणाने सांगितलं की, “होळीच्या दिवशी दारु प्यायलो होतो. त्या दिवशी हा प्रकार कसा घडला याची कल्पना नाही.” त्यानंतर पोलिस तरुणासह बुलेट घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथे पोलिसांनी बुलेट जप्त करत पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.
होळीच्या दिवशी जयपूरच्या जवाहर सर्कल भागात दोघं बुलेटवर आश्लिल चाळे करताना दिसले होते. तर तरुण निष्काळजीपणे बुलेट चालवत होता. तरुणी बुलेटच्या टाकीवर बसली होती आणि त्याला मिठी मारत रोमान्स करत होती. दोघांनी वाहतूक नियमांच अक्षरश: धिंडवडे काढले.
बुलेटवर विना हेल्मेट निष्काळजीपणे दुचाकी चालवल्याप्रकरणी तरुण आणि सदर तरुणीवर कारवाई केली आहे. पोलिसांनी मोटार वाहन कायदा 1988 आणि राजस्थान मोटर वाहन कायदा 1990 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच एमव्ही अॅक्ट 1988 अंतर्गत बुलेट जप्त केली आहे.
15 दिवसानंतर दोघांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. विना कागदपत्रं, दारुच्या नशेत हेल्मेट न घालता स्टंट केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी कलम 194 डी, 184, 181 आणि 207 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.