नवी दिल्ली : इंधन संपले, बॅटरी डाऊन झाली… आणि भारताची मंगळयान मोहिम फत्ते झाली. मंगळयान मोहिम अर्थात मार्स ऑर्बिटर मिशनने (MOM) यशस्वी पल्ला गाठला आहे. तब्बल आठ वर्षे आठ दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर ही मोहिम संपष्टात आली आहे. ही मोहिम यशस्वी झाली असून मंगळावर थेट एकाच वेळी पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.
5 नोव्हेंबर 2013 रोजी आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून भारातचे मंगळयान अवकाशात झेपावले . 24 सप्टेंबर 2014 रोजी यानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.
ही मोहिम संपल्याचे इस्रोने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले आहे. मंगळयानमध्ये आता कोणतेही इंधन शिल्लक नाही. याची बॅटरीही पूर्णपणे निकामी झाली आहे. मंगळयानाशी असलेला संपर्क तुटला आहे. मात्र, इस्रोने याबाबतची अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.
मंगळयान ही इस्त्रोची पहिली इंटर-प्लॅनेटरी मोहीम होती. पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. या मोहिमेसाठी 450 कोटींचा खर्च आला. यशस्वी मंगळ अंतराळ यानाचे चित्र भारताच्या दोन हजार रुपयाच्या नोटेच्या मागच्या बाजूवर आहे.