नवी दिल्ली : प्रेमात लोकं आंधळी होतात, असं आपण ऐकलं आत्तापर्यंत ऐकलं असेल. लव्ह के लिए कुछ भी करेगा… असं अनेकजण म्हणतात, पण प्रत्यक्षात वेळ आल्यावर अनेकांची बोबडी वळते. पण एक असे इसम आहेत जे प्रेमासाठी सातासमुद्रापार गेले आणि तेही सायकलवर प्रवास करून.. भारतातील कलाकार प्रद्युम्न कुमार महानंदिया यांची ही अनोखी कहाणी आहे. त्यांना पीके महानंदिया या नावाने ओळखले जाते.
स्वीडनची रहिवासी शार्लोट वॉन शेडविन ही त्यांची पत्नी आहे. दोघेही 1975 मध्ये दिल्लीत भेटले होते. जेव्हा शार्लोट यांनी महानंदियाच्या कलेबद्दल ऐकले तेव्हा ती त्यांना भेटण्यासाठी युरोपमधून भारतात गेली. त्यांना महानंदिया यांच्याकडून त्यांचे एक पोर्ट्रेट बनवून हवे होते. जेव्हा महानंदिया यांची शार्लोटशी भेट झाली तेव्हा ते उदयोन्मुख कलाकार होते, आपला ठसा उमटवत होता. ते दिल्लीच्या कला महाविद्यालयात शिकणारा गरीब विद्यार्थी होता. महानंदिया जेव्हा शार्लोटचे पोर्ट्रेट बनवत होते, तेव्हाच ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
कसे पडले प्रेमात ?
महानंदिया हे शार्लोटच्या सौंदर्याच्या प्रेमात पडले, तर त्यांच्या साधेपणाने शार्लोटचे मन जिंकले. शार्लोटची स्वीडनला घरी परतण्याची वेळ आली तेव्हा दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. एका जुन्या मुलाखतीत महानंदिया म्हणाले होती, ‘जेव्हा ती माझ्या वडिलांना पहिल्यांदा भेटली तेव्हा तिने साडी नेसली होती. मला माहित नव्हते की ती हे सर्व कसे हाताळेल. वडिलांच्या आणि घरच्यांच्या आशीर्वादाने आदिवासी परंपरेने आमचा विवाह झाला.
शार्लोट जेव्हा स्वीडनला जाण्यासाठी निघाल्या तेव्हा त्यांनी महानंदिया यांना सोबत येण्यास सांगितले. पण त्यांना त्यांचेशिक्षण पूर्ण करायचे होते. पण ते स्वीडनला तिच्या घरी येतीलच असं वचन महानंदिया यांनी शार्लोटला दिले. दरम्यान, दोघेही पत्राद्वारे एकमेकांशी जोडलेले राहिले. एका वर्षानंतर महानंदिया यांनी आपल्या पत्नीला भेटण्याचा बेत आखला, पण विमानाचे तिकीट घेण्यासाठी पैसे नव्हते. म्हणून त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या काही वस्तू विकून त्यांनी एक सायकल विकत घेतली.
अनेक देशांतून केला प्रवास
पुढील चार महिन्यात महानंदिया यांनी पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण आणि तुर्की पार केले. त्यांची सायकल वाटेत अनेक वेळा तुटली आणि अनेक दिवस त्यांना अन्नाशिवाय, भुकेलंही रहावं लागलं. अनेक अडचणी आल्या पण त्यांचा धीर सुटला नाही, ते पुढे मार्गक्रमणा करतच राहिले.
पीके महानंदिया यांनी 22 जानेवारी 1977 रोजी हा प्रवास सुरू केला. ते दररोज सायकलने 70 किलोमीटरचा प्रवास करत असत. महानंदिया म्हणतात, ‘कलेने मला वाचवले आहे. मी लोकांचे पोर्ट्रेट बनवले आणि त्याबदल्यात काहींनी मला पैसे दिले, तर काहींनी मला जेवण आणि राहण्याची सोय करून दिली. 28 मे रोजी ते इस्तंबूल आणि व्हिएन्ना मार्गे युरोपला पोहोचले आणि ट्रेनने गोटेन्बर्गला गेला. अखेर त्यांची शार्लोट यांच्याशी भेट झाली, तेथे त्या दोघांनी अधिकृतपणे लग्न केले.
ते म्हणतात, ‘मला युरोपच्या संस्कृतीबद्दल काहीच माहिती नव्हती. माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं पण प्रत्येक पावलावर शार्लोटने मला साथ दिली. ती अतिशय खास व्यक्ती आहे. मी आजही तिच्यावर तितकंच प्रेम करतो जितके मी 1975 मध्ये करत होतो. सध्या हे दोघेही, त्यांच्या दोन मुलांसह स्वीडनमध्ये राहतात. पीके महानंदिया आजही कलाकार म्हणून काम करतात.