कुठेही कचऱ्याचा ढीग दिसला की आपला हात आधी नाकावर जातो आणि त्याकडे आपण लागलीच पाठ फिरवून घेतो. पण कचऱ्याचा हाच ढीग एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही, असं तुम्हाला कोणी सांगितलं तर ? ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील रहिवासी लिओनार्डो अर्बानो यांनी हे सिद्ध केले आहे. कारण तो केवळ कचरा गोळा करून लक्षाधीश बनला नाही तर आता श्रीमंतांची , ऐशोरामी जीवनशैलीदेखील जगत आहे.
हे सर्व वाचून तुम्हाला विचित्र वाटत असेल, पण विश्वास ठेवा, हे पूर्णपणे सत्य आहे. लिओनार्डोने सांगितले की, दररोज सकाळी नाश्ता केल्यानंतर तो कचरा गोळा करण्यासाठी निघतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण, असं करून (कचरा गोळा करून) त्याने एका वर्षात 1,00,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स (म्हणजे 56 लाखांपेक्षा जास्त) कमावले आहेत. कोणी कचऱ्यातून करोडपती कसा बनू शकतो अशा प्रश्न आता तुम्हाला प़डला असेल ना. चला जाणून घेऊया त्याचं उत्तर…
कसे कमावतो लाखो रुपये ?
खरं तर, ऑस्ट्रेलियामध्ये, स्थानिक परिषदांद्वारे वर्षातून अनेक वेळा मोफत कचरा संकलन सेवा पुरविल्या जातात. त्यायामुळे लोक घरात पडलेल्या निरुपयोगी वस्तू कचऱ्यात टाकतात. आणि हीच संधी लिओनार्डोने हेरली आणि तो मुद्दा त्याच्यासाठी गेम चेंजर ठरला. लिओनार्डो हा रोज सकाळी बाहेर पडतो आणि आपल्या पारखी डोळ्यांचा वापर करून तो कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडलेल्या चांगल्या गोष्टी गोळा करतो. मग त्याच वस्तू तो दुरुस्त करून ऑनलाइन विकतो. लिओनार्डोच्या या कामाला ‘डम्पस्टर डायव्हिंग’ म्हणतात. गेल्या चार वर्षांपासून तो हे काम करत आहेत. यातून मिळणाऱ्या पैशातून तो आपले जेवण आणि अपार्टमेंटचे भाडे सहज भरतो.
सीएनबीसीशी बोलताना त्याने सांगितलं की यामुळे त्याला नवीन गॅझेट खरेदी करण्याची आणि त्याचे जुने, निरुपयोगी झालेले गॅझेट फेकून देण्याची संधी मिळते. त्याला ज्या वस्तू सापडतात, त्यामध्ये फेंडी बॅग्स, कॉफी मशीन, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचाही समावेश होता. त्याची ही कहाणी वाचली तर एक नक्की पटतं की पारखी नजर आणि मेहनत करण्याची वृत्ती असेल कचरा देखील खजिन्यापेक्षा कमी मौल्यवान नाही, हेच खरं.