मार्केटमध्ये, बाजारात अशुद्ध तूप विकलं जात असल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकत असतो. भेसळयुक्त तुपामुळे आरोग्याला त्रास होऊ शकतो, हे लक्षात ठेवून आणि भीतीपायी अनेक जण बाहेरचं तूप खरेदी करणं टाळतात. त्याऐवजी घरच्या घरीच चांगलं विरजण लावून, दह्याचं लोणी आणि नंतर तूप कढवणं याला अनेकांची पसंती असतं. घरच्या घरी कढवलेलं, कणीदार तूप तर सर्वांनांच आवडतं. पण या विरजलेल्या दह्याचं लोणी आणि नंतर त्याचं तूप कढवण्याच्या प्रक्रियेला बराच वेळ लागतो.
पण आता नेहमीच्या या कामाला फारसा वेळ न लागता आणि जास्त मेहनत करावी न लागता अवघ्या काही मिनिटांतच वॉशिंग मशीनच्या मदतीने घरच्या घरी तूप बनवता येईल, असं तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का ?
चक्क वॉशिंग मशीनमध्ये बनवलं तूप
हो…. हे वाचून खरंतर तुम्हालाही हसू येईल,कदाचित तुम्ही डोक्यावरही हात मारून घ्याल, पण हेच खरं आहे. सोशल मीडियावर सध्या एका इसमाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्याचीच सगळीकडे चर्चा आहे. इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केलेल्या या व्हिडीओत एका माणसाने लोण्याने भरलेला एक अख्खा ड्रम थेट वॉशिंग मशीनमध्ये उपडा केला आणि सगळं लोणी मशीन मध्ये काढलं. त्यानंतर तो त्याच मशीनमध्ये गरम, उकळतं पाणी टाकलं. त्यानंतर त्याने वॉशिंग मशीनचं झाकण काढलं आणि ते ऑन केलं. मशीन सुरू होताच पुढल्या काही सेकंदांमध्ये मशीनमध्ये थेट तूप तयार झालेलं दिसलं.
व्हिडीओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्सही
वॉशिंग मशिनमध्ये तूप बनवण्याचे हे अजब गजब टेक्निक दाखवणारं हे रील @sanjay_dairyfarmer या हँडलवर पोस्ट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओला थेट 11.5 मिलियनपेक्षा व्ह्यूज मिळाले असून लाखो लोकांनी ते लाईक्सही केलेत.
गहू वाळवण्याचा व्हिडीओही व्हायरल
असाच आणखी एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. ही क्लिप पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसू आले असेल. तुमच्यापैकी किती जणांनी आश्चर्याने डोक्यालाही हात लावला असेल. भारतातील लोकांना विनाकारण जुगाडू म्हटले जात नाही. सोशल मीडियावर दररोज असे विचित्र, वेळ वाचवणारे हॅक व्हिडिओ व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एका व्यक्तीने वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये गहू वाळवले.