अमेरिके(America)तल्या मेरीलँड(Maryland)मध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 100हून अधिक सापां(Snakes)नी एका व्यक्तीच्या घराला घेरलं होतं. ही बाब 19 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजताची (अमेरिकन वेळ). आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. प्रत्यक्षात शेजाऱ्यांना काही दिवस ती व्यक्ती दिसली नाही. यानंतर पोलिसांना निदर्शनास आलं, की ही 49 वर्षीय व्यक्ती जमिनीवर तोंड करून पडली आहे.
व्यक्तीचा मृत्यू
या प्रकरणाची माहिती मिळताच आपत्कालीन वैद्यकीय सेवा (ईएमएस) आणि अग्निशामक दला(Fire Brigade)चं पथक पोहोचलं. तिथं त्यांना हा माणूस मृतावस्थेत आढळला. यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात या प्रकरणात दुसरं काहीही निष्पन्न झालं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, हा मृत्यू झालेली व्यक्ती कोण? ही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
शेजाऱ्यांनाही नव्हती माहिती
चार्ल्स काउंटी शेरीफ कार्यालयाकडून या संदर्भात एक प्रेस रिलीजदेखील जारी करण्यात आलं आहे. ज्यामध्ये पोलिसांना घरातून आणि बाहेरून 100हून अधिक साप सापडल्याचं समोर आलं आहे. मात्र, घरात आणि बाहेर इतके साप असल्याची माहिती शेजाऱ्यांनाही नव्हती. चार्ल्स काउंटी अॅनिमल कंट्रोलचे सदस्य आता या सापांना पकडण्याच्या कामात आहेत.
अजगरही सापडलं
प्राणी नियंत्रणाच्या प्रवक्त्या जेनिफर हॅरिस यांनी Wusa 9ला सांगितलं, की या व्यक्तीच्या घरात आणि बाहेर सुमारे 125 साप आढळून आले होते. घरातला सर्वात लांब साप 14 फूट बर्मी पायथन (अजगर) सापही सापडला. हॅरिसच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीस वर्षांत त्यांनी अमेरिकेत इतक्या मोठ्या प्रमाणात साप पाहिले नव्हते.