आई कुठे काय करते ते आईच सगळं काही करते! एक वर्षाचं बाळ कडेवर घेऊन रिक्षा चालवणारी ‘दुर्गा’

| Updated on: Sep 25, 2022 | 2:27 PM

संघर्ष तिच्याही वाट्याला आला. तिने तो स्वीकारला. त्याचाच हा फोटो तिच्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी सांगतोय...

आई कुठे काय करते ते आईच सगळं काही करते! एक वर्षाचं बाळ कडेवर घेऊन रिक्षा चालवणारी दुर्गा
चंचलचा प्रेरणादायी प्रवास
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

चंचल शर्मा (Chanchal Sharma). वर तुम्ही जो फोटो (Viral Photo) पाहताय त्यात बाळाला समोर बांधून रिक्षा चालवताना जी दिसतेय, त्या महिलेचं हे नाव. बाळाला तिने कडेवर घेतलंय. गच्च बांधलंय. ती ई-रिक्षा (E-Rikshaw) चालवते. घर चालवण्यासाठी असं करण्याशिवाय दुसरा पर्याय तिच्याजवळ नाही. नवरा छळायचा. अखेर एक दिवस तान्ह्या बाळासह बायकोलाही तो सोडून गेला. पदरात असलेलं एक वर्षाचं बाळ सांभाळयचं कसं? पैसे कुठून कमावणार? काय काम करणार? अनेक प्रश्न चंचलसमोर अचानक उभे ठाकले. पण तिनं हार मानली नाही. जगण्यासाठी संघर्ष करायचं तिनं ठरवलं.

चंचल कामाच्या शोधात होती. नवरा सोडून गेल्यानं खायचे वांदे झाले होते. पण काम करायचं म्हटलं तर मुलाकडे लक्ष देता येणार नाही. पण मुलाला मोठं करायचं, तर काम करावंच लागणार. त्याला चांगलं भविष्य द्यायचं असेल तर पैसे कमवावेच लागणार. त्यासाठी अखेर तिनं मुलाला समोर बांधलं. रिक्षा चालवायचं ठरवलं. चिमुरड्याला सोबत घेऊन काम करत जगण्याचा संघर्ष करणारी चंचलची कहाणी अनेकांना प्रेरणा देतेय.

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, चंचल शर्मा ही नोएडामध्ये राहणारी एक महिला आहे. ती रिक्षा चालवून स्वतःचा आणि मुलाचा उदरनिर्वाह करते. नवरा सोडून गेल्यानंतर तिला रिक्षा चालवण्याचं काम करण्यावाचून दुसरा पर्याय उरला नव्हता. पण हा पर्यायही सोप्पा नव्हता. मुलाला कडेवर बांधून रिक्षा चालवणाऱ्या चंचलला अजून बराच संघर्ष करावा लागणार होता. तो तिने केलाही. पण हार नाही मानली.

हे सुद्धा वाचा

अनेक ई-रिक्षा चालकांनी चंचलला विरोध केला. आपल्या मार्गावरील भाडी मारल्यानं तिला इतर रिक्षा चालकांच्या रोषाचा सामना करावा लागला. पण अखेर नोएडा पोलीस चंचलच्या मदतीला धावले. नोएडा पोलीस आणि एआयबी आऊटपोस्ट स्टाफने चंचली मदत केली. त्यामुळे तिला मदत झाली.

दिवसाला चंचल ई-रिक्षा चालवून 300 ते 400 रुपये कमावते. त्यावर तिचं आणि तिच्या एक वर्षाच्या बाळाचं पोट आहे. मुलाचा सांभाळ करत एक वर्षाच्या चिमुरड्याला सांभाळून काम करणाऱ्या चंचलची कमाई फार नसेल. पण तिने दाखवलेलं धाडस मात्र अमूल्य आहे. त्याची कशातच किंमत करता येणार नाही.

2019 मध्ये चंचलचं लग्न झालं होतं. लग्नाला आता तीन वर्ष झालीत. पण लग्नाच्या दुसऱ्या तिसऱ्या महिन्यापासून पतीने माझा छळ सुरु केला होता, असं तिने म्हटलंय. आम्ही कोर्टात दाद मागितली. केस अजूनही सुरु आहेत. मी लहान असतानाच माझे वडील देवाघरी गेले. मला चार बहिणी आहेत. त्यांचीही लग्न झाली आहेत. आईचं आता वय झालं. ती भाजी विकून स्वतःचं घर चालवते.

जगण्याचा संघर्ष प्रत्येकाला आपआपल्या परीने करावा लागतो. चंचलाही तो करावा लागला. पण सहानुभूती मिळवण्यापेक्षा तिने संघर्षाचा मार्ग पत्करला. एक वर्षाच्या बाळाची आई त्याला मोठं करण्यासाठी, चांगलं भविष्य देण्यासाठी जे करते, ते कौतुक करावं तितकं कमीय. सध्या चंचला फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. तिचा कहाणीही अनेकांच्या काळजाला हात घालून गेलीय.