पॅरीस : सोशल मिडीयाने आपले जीवन व्यापले आहे. आपल्या प्रत्येक आनंदी क्षणांना आपण सोशल मिडीयावर शेअर करून इतरांना आपण किती आनंदी आहोत हे दाखविण्यात धन्यता मानत आहोत. परंतू असे करताना कित्येकदा आपण आपल्या प्रायव्हसीचा भंग स्वत:च नकळत न कळत करीत असतो. आपल्या लहान मुलांचे फोटो आपण आवडीने सोशल मिडीयावर शेअर करीत असतो. परंतू यापुढे अशाप्रकारे लहानग्यांचे फोटो शेअर करणे पालकांना महाग पडू शकते.
लहान मुलांचे फोटो शेअर करीत असताना आपल्याकडून त्यांच्या प्रायव्हसीचा भंग होत असतो. लहान मुलांच्या मर्जीविरूद्ध त्यांचे फोटो सोशल मिडीयावर जाहीर करणे या देशात आता कायद्याविरूद्ध मानले जाणार आहे. फ्रान्सच्या संसदेने या संदर्भात एक कायदा पास केला आहे. लहान मुलांच्या प्रायव्हसी संदर्भात एक बिल तेथील संसदेत आणले होते. या कायद्यानूसार लहान मुलांच्या परवानगी शिवाय त्यांचे फोटो पालक सोशल मिडीयावर शेअर करू शकणार नाहीत. जर तसे केले तर अशा पालकाला कायद्यानूसार शिक्षा होणार आहे.
लहान मुलांनाही प्रायव्हसी आहे..
फ्रान्सचे खासदार ब्रूनो स्टूडर यांनी लहान मुलांच्या प्रायव्हसीचा कायदा संसदेत आणला आहे. या कायद्यानूसार पालकांना त्यांच्या मुलांच्या बाबतीत अधिक सजग बनविणे आणि मुलांना त्यांच्या हक्कांविषयी जागृत करण्याचे काम सुरू आहे. लहानग्यांचेही खाजगी जीवन असून त्याचा भंग होता कामा नये असा या कायद्यामागचा उद्देश्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या फोटोंसाठी केवळ पालकच जबाबदार आहेत. टीएनेजर मुलांची इतकी छायाचित्रे शेअर केली जात आहेत की त्याचा गैरवापर होऊ शकतो. शाळेत मुले फोटोंमुळे टार्गेट होऊ शकतात असे म्हटले जात आहे.
कायद्यात काय आहे ?
नवीन कायद्याप्रमाणे लहान मुलांचे फोटो पालकांना शेअर करण्यापासून रोखण्यासाठी कोर्टाला आता बंदी घालण्याचा अधिकार मिळणार आहे. लहान मुलांच्या हक्कांबाबत आई आणि वडील दोघेही जबाबदार असणार आहेत. जर लहान मुलांचे फोटो सोशल मिडीयावर टाकण्यापूर्वी मुलांच्या वयानूरूप पालकांना त्यांची पूर्व परवानगी घ्यावी लागेल. या नियमाला जर कोणी बगल दिली तर त्या पालकांना शिक्षा होणार आहे. जर मुलाच्या हक्कांवर काही बंधने आली किंवा त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर याचा काही प्रभाव किंवा परीणाम झाला तर आई-वडील त्यांच्या मुलाचे फोटो कोणत्याही परिस्थितीत वापरू शकणार नसल्याचे म्हटले जात आहे.