मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( Csmia ) बिपरजॉय चक्रीवादळामुळे ( Biparjoy Cyclone ) अनेक विमानांना फटका बसला असताना 12 जून रोजी तर विमानतळावर स्वयंघोषीत संत राधे मॉं ( Radhe Maa ) यांच्या दर्शनाने प्रवाशांची मन:शांती भंगली. राधे मॉं यांनी प्रवाशांना विमानतळावर मिनी सत्संग घेऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याने विमानतळावर अनोखा तमाशा झाला. मग आधीच विमानांच्या लेट उड्डाणाने भडकलेली प्रवाशांची माथी राधे मॉंच्या उपस्थितीने आणखी भडकली. त्यानंतर काय झाले ते पाहा..
बिपरजॉय चक्रीवादळाने एअर इंडीयाचे मुंबई ते कतारची राजधानी दोहाला जाणारे फ्लाईट क्रमांक AI 981 तब्बल तीन तास लेट झाले. त्यामुळे प्रवाशांची माथी भडकली आणि विमानतळावर प्रचंड गर्दी होऊन प्रवाशांनी एअर इंडीयाच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. विमान तळ प्रशासनाने प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतू काही उपयोग झाला नाही. सायं.7.30 वाजताचे विमानाचे उड्डाण होणे अपेक्षित होते. परंतू अचानक एका प्रवाशाने राधे मॉं यांना कारमधून उतरताना पाहिले त्यानंतर त्याने राधे मॉंची जयजयकार करायला सुरुवात केली. त्याने सुखावलेल्या राधे मॉं यांनी आयते भक्त पाहून तेथेच मिनी सत्संगच सुरु केला.
राधे मॉंनी आपल्या महागड्या गाडीतून खाली उतरून प्रवाशांना शांत राहण्याची विनंती केली. राधे मॉंनी एअर इंडियाला दोष देऊ नका आणि देवाची प्रार्थना करा असे सांगितले. राधे माँने त्याना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाल्या, “जे काही घडते ते देवाच्या इच्छेने होते. त्यानंतर प्रवाशाने राधे मॉंवर प्रश्नांची सरबत्ती केली. आणि दोघांमध्ये वाद सुरु झाला. वाद इतका वाढला की, राधे मॉंने प्रवचन सोडून त्याला, शट युवर माऊथ असे इंग्रजीत झाडले आणि त्यांनी तेथून काढता पाय घेतला, अखेर रात्री साडे दहा वाजता दोहाला जाणाऱ्या विमानाचे उड्डाण झाले. परंतू काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षडरिपूंवर विजय मिळवा असा संदेश देणाऱ्या स्वयंघोषीत संत राधे मॉं यांना प्रवाशाच्या अंगावर खेकसताना पाहून प्रवासी भक्तही हैराण झाले.
राधे माँ यांचे खरे नाव सुखविंदर कौर आहे. सलमान खानच्या रिएलिटी शो बिग बॉस 14 मध्ये त्यांनी पाहुणा कलाकर म्हणून काम केले होते. त्यांचा मुलगा हरजिंदर सिंग हा अभिनेता आहे, ज्याने अलीकडेच रणदीप हुड्डा सोबत जिओ सिनेमावरील ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या ओटीटीवरील मालिकेत पदार्पण केले आहे. अनेक राजकारणी आणि सेलिब्रिटी राधे माँचे भक्त आहेत. त्यात सुभाष घई, मनोज तिवारी, रवी किशन, डॉली बिंद्रा, प्रल्हाद कक्कर, नवियोत सिंग सिद्धू आणि दलेर मेहंदी आहेत.