सध्या सोशल मीडियावर रील्सची क्रेझ पाहायला मिळते. कलाकार, इन्फ्लुएंसर वेगवेगळे व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. या रील्सला नेटकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळतो. मराठी इन्फ्लुएंसर्सचे रील्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही रील्स आवडतात. काही इन्फ्लुएंसर्सचे रील्स ते पाहतात. पण सध्या राज ठाकरे हे स्वत: एका रीलमध्ये पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच रील केलं आहे. त्यांचं हे पहिलं वहिलं रील सोशल मीडियावर चर्चेत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी इन्फ्लुएंसर अथर्व सुदामे याच्यासोबत रील केलं आहे. अथर्व हा राज ठाकरे यांचा आवडता इन्फ्लुएंसर आहे. एका भाषणादरम्यानही राज ठाकरे यांनी त्याचा उल्लेख केला होता. त्याच्याचसोबत राज ठाकरे यांनी रील बनवलं आहे. या रीलमध्ये अथर्व आणि राज ठाकरे यांच्यात मराठी भाषा अन् महाराष्ट्र याबाबतचा संवाद पाहायला मिळतोय.
महाराष्ट्र दिनानिमित्तच्या भाषणाची अथर्व सुदामे तयारी करतो आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाची तो उजळणी करताना दिसतो. याचवेळी राज ठाकरे तिथे येतात. अथर्वच्या भाषणाचा मजकूर पाहतात. चांगलं भाषण लिहिलंय, असं राज ठाकरे अथर्वला म्हणतात. इतिहास, संस्कृतीबद्दल उत्तम लिहिलंय. पण आज आपण काय करतोय, हे देखील महत्वाचं आहे. त्या-त्या पिढ्यांनी तेव्हा चांगलंच काम केलं आहे. पण आज आपली पिढी महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी काय करतेय, याचा विचार होणं गरजेचं आहे. मराठी भाषा रुजवली पाहिजे. मराठी भाषा बोलली पाहिजे, असं राज ठाकरे या व्हीडिओत म्हणतात.
राज ठाकरे आणि अथर्व सुदामे यांच्या रीलला 28 लाख लोकांनी पाहिलं आहे. तर अडीच लाख लोकांनी लाईक केलंय. या व्हीडिओवर अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने कमेंट केली आहे. आज आपण असं काय करणार आहोत, ज्यातून महाराष्ट्र पुढे जाईल? योग्य प्रश्न आणि विषयाची मांडणी देखील… साहेब आणि अथर्व मस्त व्हीडिओ…, असं ती म्हणाली आहे. तर भावाने राजसाहेब यांना पण रील मध्ये आणले, जिंकलास दोस्ता, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.
राज ठाकरे… महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीचं नाव. राज ठाकरे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतं, ते त्यांचं रूबाबदार व्यक्तीमत्व. हजारोंची गर्दी असणाऱ्या सभा अन् राज्याच्या राजकारणात वेगळं वलय असणारा राजकीय नेता. पण राज ठाकरे यांचं एक वेगळ रूप तुम्हाला या रीलच्या माध्यमातून पाहायला मिळेल.