मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमती वाढताना दिसत आहेत. वस्तुतः जागतिक बाजारातील वाढीचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येत आहे. आज सकाळी 11.22 वाजता सोन्याच्या भावात 153 रुपयांची वाढ झाली आहे. 153 रुपयांच्या वाढीसह दहा ग्रॅम सोन्याची किंमत 49,325 रुपयांवर गेली आहे. कोरोनावरील लसीच्या बातम्यांचा परिणाम सोन्याच्या किमतींवर दिसून येतोय. (Gold Silver Price India)
चांदीच्या किमतीत घट
एकीकडे सोन्याच्या किमतीत वाढ नोंदविण्यात आली आहे, तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत घट झाला आहे. सोमवारी सकाळी चांदीचा दर कमी झालेला पाहायला मिळाला. सकाळी 170 रुपयांनी दर कमी होत चांदीचा 63643 दर झाला.
सोनं आतापर्यंत इतकं स्वस्त झालं
भारतीय बाजारात ऑगस्टपासून सोन्याच्या किंमतीत सुमारे 8000 रुपयांची घसरण झाली आहे. ऑगस्टमध्ये सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 56,379 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली होती, ती आता 47,856 रुपयांवर आली आहे. कोरोना लस आल्याच्या बातमीमुळे गुंतवणूकदारांनी सोन्यापेक्षा इक्विटी बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे जागतिक पातळीवर सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये घट कायम आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येतोय.
गुंतवणूकीपूर्वी योग्य योजना करा
कोणत्याही गुंतवणूकीत, खरेदी कधी करावी आणि विक्री कधी करावी याबद्दल निश्चित ठरवणे आवश्यक असते. अनुज गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉलरच्या कमकुवततेमुळे मागील काही काळात सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली.कोरोनाची लस लवकरच येणार असल्यानं सोन्याच्या किंमतीत घट होण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत डिसेंबरमध्ये सोन्याची किंमत सुमारे 48,600 रुपयांच्या घरात जाऊ शकते.