Chinese robotic dog : कमी झालेल्या साथीच्या आजारामुळे जगातील अनेक देशांतील लोक सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी चीनमध्ये कोविड-19च्या प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. नागरिकांना घरात बंदिस्त व्हावे लागत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने चीनमधील (China) अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने लोकांना जागरूक करण्यासाठी रोबो कुत्र्यांचा (Dogs) वापर सुरू केला आहे. रोबोटिक कुत्र्याच्या पाठीवर स्पीकर बांधून ते निर्मनुष्य रस्त्यावर चालवले जात आहे, जेणेकरून आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना ही घोषणा ऐकू येईल. चीनमधील सर्वात मोठे शहर आणि आर्थिक महासत्ता असलेल्या शांघायमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. देशाच्या शून्य-कोविड धोरणांतर्गत येथील काही रहिवाशांना त्यांच्या घरात 10 दिवस अलगीकरणाचा सामना करावा लागत आहे.
बोस्टन डायनॅमिक्स स्पॉटसारखा दिसणारा चार पायांच्या रोबोटचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक रोबोटिक कुत्रा डोक्याला मेगाफोन स्पीकर लावून रिकाम्या रस्त्यावर फिरत असल्याचे दिसले. रोबोटिक कुत्र्याचे काम महत्त्वाचे आरोग्यविषयक घोषणा करणे आणि नागरिकांना COVID प्रोटोकॉलची आठवण करून देणे हे आहे.
काळ्या रंगाच्या रोबो कुत्र्याने ऑनलाइन नेटिझन्सना खूश केले आहे. झुआनचेंग डेलीनुसार, चेहऱ्यावर मास्क घाला, वारंवार हात धुवा, तापमान तपासा आणि तुमचा फ्लॅट निर्जंतुक करा यासारख्या घोषणा रोबोटिक कुत्र्याच्या पाठीवर मेगाफोन स्पीकरद्वारे केल्या जात आहेत. व्हिडिओ पाहून यूझर्सना वाटले, की हा सायन्स फिक्शन फिल्मचा व्हिडिओ आहे.