नवी दिल्ली | 21 ऑगस्ट 2023 : रशियाच्या चंद्रयान मोहीमेवर निघालेले लूना-25 हे यान चंद्राच्या कक्षेत नियंत्रणाबाहेर जाऊन क्रॅश झाल्याने अनेकांना धक्का बसला. शीतयुद्धकाळात अमेरिकेशी स्पर्धा करणारा रशिया अंतराळात पहिला उपग्रह आणि पहिला मानव पाठविणाऱ्या रशियाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहीले लॅंडींग करण्याचे स्वप्न चक्काचूर झाले आहे. त्यामुळे पाच दशकानंतर चंद्रावर मोहीम आखणाऱ्या रशियाला याचा फटका बसला आहे. दरम्यान, रशियाच्या चंद्रमोहीमेचे सल्लागार ज्येष्ठ संशोधक मिखाईल मरोव यांना धक्का बसल्याने त्यांना रुग्णालयात भरती केले आहे.
भारताच्या आधी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करण्याचे रशियाचे स्वप्न भंग झाले आहे. साल 1947 नंतर रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच निघालेले रशियाचे लूना-25 चंद्रयानाचा शनिवारी चंद्राच्या कक्षेत भरकटल्याने संपर्क तुटला. रशियाने शनिवारी सायंकाळी लूना-25 क्रॅश झाले असावे असे जाहीर केल्यानंतर रशियन अंतराळ कार्यक्रमाला धक्का बसला आहे. या घटनेचे वृत्त समजल्यानंतर रशियाचे बुजुर्ग संशोधक मिखाईल मरोव ( 90 ) यांना धक्का बसला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
साल 1950 च्या दशकात रशिया आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या शीतयुद्धात रशियाच्या अंतराळ मोहीमेने उज्ज्वल यश मिळविले होते. रशियाने पहीला स्पुटनिक हा उपग्रह अंतराळात पाठवून जगाला आश्चर्यचकीत केले होते. नंतर अंतराळात पहिला मानव पाठविण्यातही रशियाने आघाडी घेतली. त्यानंतर अपोलो – 11 मोहिमेंतर्गत 20 जुलै 1969 मध्ये चंद्रावर पहिला मानव ( नील आर्मस्ट्रॉंग ) पाठविण्यात मात्र अमेरिकेला यश आले.
भारताचे चंद्रयान-3 ने आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथून रॉकेटच्या सहाय्याने 14 जुलै रोजी उड्डाण घेतले. नंतर आधी पृथ्वीकक्षेभोवती प्रदक्षिणा घालून नंतर 5 ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या कक्षेत पोहचले. आता येत्या 23 ऑगस्ट रोजी सायंकाली 6.04 वा. चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींगचा प्रयत्न करणार आहे. रशियाने आपल्यापेक्षा अधिक शक्तीशाली रॉकेटद्वारे 11 ऑगस्ट रोजी उड्डाण घेत थेट चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु केला होता. भारताच्या आधी 21 ऑगस्ट रोजी रशियाचा चंद्राच्या दक्षिण धुव्रावर लॅंडीगचा प्रयत्न होता. परंतू तो अयशस्वी ठरला आहे. या घटनेची बातमी रशियाच्या सरकारी चॅनलवर केवळ 26 सेंकदच दाखविण्यात आली.