क्वेटो : विमानाला जर पक्षाने धडक दिली तर अनेकदा विमानाला सुखरूपपणे उतरावे लागते. पक्षाच्या धडकेने इंजिनात बिघाड झाल्याने विमानाचे इमर्जन्सी लॅंडींग करावे लागल्याच्या घटना तुम्ही वृत्तपत्रात अनेकदा वाचल्या असतील. असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल होत आहे. ज्यात एक महाकाय पक्षी विमानाला धडकल्याने विमानाच्या पायलट समोरील काच तोडून तो आत शिरल्याची घटना त्यात दिसत आहे. हा व्हिडीओत पायलटची अवस्था बिकट दिसत आहे. त्याच्या तोंडावर रक्ताचे शिंतोडे दिसत आहेत. परंतू अशाही अवस्थेत त्याने विमानाला सुखरुप लॅंडींग केले आहे.
या भयानक व्हिडीओला पोस्ट करणाऱ्या न्यूज एजन्सीनूसार ही घटना इक्वाडोर मध्ये घडली आहे. रशिया टूडेने दिलेल्या बातमीनूसार या विमानाला पायलटने सुखरुपपणे लॅंडींग केले आहे. व्हिडीओतील पायलटची ओळख पटली असून त्याचे नाव एरीयल वॅलेंट आहे. एका ट्वीटरने दिलेल्या बातमीनूसार इक्वाडोरच्या लॉस रियोस प्रांतातील एका विशाल पक्षाने विमानाच्या विंडशील्डला धडक दिल्यानंतर पायलटने आपल्या विमानाला सुखरुपपणे उतरवले आहे. एरीयल यांना सुदैवाने काही गंभीर दुखापत झालेली नाही.
या व्हिडीओला ट्वीटरवर शेअर करण्यात आले असून त्यावर अनेक प्रतिक्रीया येत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, नशीबवान पायलट आहे. माझ्या परिचितातील एका पायलटला अशा अपघातात आपले डोळे गमवावे लागले होते. तर अन्य एका युजरने म्हटले आहे की, मी रोड किल बाबत एकलेले आहे परंतू एअरकिलबद्दल कधी ऐकलेले नाही किंवा पाहीलेले नाही. तर तिसऱ्याने लिहीले आहे की, या पायलटच्या धैर्याला आणि समंजसपणाची तारीफ करायला हवी. हा खरोखरच लिजेंड आहे.
पायलटच्या चेहऱ्यावरील रक्त कोणाचे ?
व्हायरल व्हिडीओ पायलटच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग दिसत आहेत. ते डाग कोणाचे आहेत ? हे डाग पक्षाचे आहेत की पायलटचे ? याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. अशा तणावाच्या स्थितीत पायलटला नेमके काय करायचे असते त्याचे प्रशिक्षण सुरुवातीलाच दिलेले असते असे एका इन्स्ट्रक्टरने म्हटले आहे. या पक्षाचे नाव काही जणांनी एंडीयन कोंडोर असल्याचा अंदाज काहींनी व्यक्त केला आहे. या पक्षाच्या पंखांची लांबी नऊ फुटापर्यंत असते.