कामाचा थकवा आला किंवा वारंवार तेचतेच काम करून आपणाला बोअरिंग झाल्यासारखं वाटलं की आपण छानपैकी संगीत ऐकतो. ते संगीत ऐकल्यानंतर आपल्यातील थकवा दूर होतो आणि नवचैतन्य मिळते. संगीत (Music) अनेकांची मने जोडण्याचं काम करते. संगीत ही अशी एक साधना आहे जी प्रत्येक व्यक्तीला, किंबहुना प्राणिमात्रांनाही मंत्रमुग्ध करून सोडते. सोशल मीडियात व्हायरल (Viral on Social Media) झालेल्या एका व्हिडिओतून प्राणीमात्रांनाही संगीत किती प्रिय आहे, याची प्रचिती आली आहे. गोल्डन रिट्रीवर डॉग (Golden Retriver Dog) हार्मोनियमच्या धूनवर अक्षरशः तल्लीन झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
कुत्रा हा तसा शांत न बसणारा प्राणी समजला जातो. कुठल्याही अज्ञात गोष्टीची चाहूल लागली की कुत्रा भुंकायला सुरुवात करतो. अनेक कुत्रे तर अधूनमधून भुंकून आसपासच्या रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरतात, पण सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओमधल्या कुत्र्याने भुंकणे सोडून हार्मोनियमची धून ऐकणे पसंत केले आहे.
सोशल मीडियात इंस्टाग्रामवर या कुत्र्याचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ इतका प्रेमात पडणारा आहे की व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचा आनंद इतरांनाही लुटता यावा, या हेतूने शेअर करणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त आहे.
व्हिडिओमध्ये कुत्र्याने अत्यंत मजेशीर रिअॅक्शन दिल्या आहेत. त्या रिअॅक्शन बघूनही तुम्ही पोट धरून हसाल. सध्या हा व्हिडिओ पाहणारे लोक अशाचप्रकारे मजेशीर अनुभव घेत आहेत. हार्मोनियम वाजवत असलेल्या व्यक्तीच्या पाठीमागे बसून कुत्रा शांतपणे हार्मोनियमची धून ऐकताना दिसत आहे.
जणूकाही त्यालाही हार्मोनियम वाजवण्याचा मोह आवरेनसा झाला आहे. कुत्र्याचं हे संगीत प्रेम पाहून जो तो थक्क होत आहे. किंबहुना, व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याची खुमासदार चर्चाही केली जात आहे.
सोशल मीडियामध्ये या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर लोक अधिकाधिक शेअरिंग करत आहेत. काही लोक तर वारंवार व्हिडिओ पाहून कुत्र्याच्या संगीतप्रेमाचा आनंद लुटत आहेत.