आज संपूर्ण जग प्रगती आणि आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. परिणामी अनेक अमानवी प्रथा- परंपरांना मूठमाती देऊन मानव समाज आपल्या सर्वोत्तम हित साधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे असले तरी आपल्या या जगात असे काही देश आहेत जे अजूनही अंधारयुगातच जगणारे आहेत. अश्या ठिकाणी ज्ञानाचा आणि तर्काचा प्रकाश पोहचत नाही. तर पाकिस्तान हा अश्या देशांपैकी एक आहे.
जगात बालविवाहाचे सर्वाधिक प्रमाण पाकिस्तानमध्ये आहे. तर या देशामध्ये कायद्यानुसार लग्न करताना मुलाचे वय हे १८ वर्ष निश्चित करण्यात आले आहे तर मुलीचे वय १६ वर्ष आहे. यामधील असमानता अजूनही पाकिस्तानसारख्या देशात आहे, जिथे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार दोन्ही लिंगांचे किमान वय १८ वर्षे मानले जात आहे, आणि तेथेही विषमता अस्तित्वात आहे. पाकिस्तानमध्ये ३० टक्के मुलींचे लग्न वयाच्या १८ व्या वर्षा आधीच होते. तर युनिसेफच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानात 18.9 दशलक्ष मुलींचे लग्न वयाच्या 18 व्या वर्षाआधी केले जाते आणि 4.6 दशलक्ष लग्न हे 16 वर्षे पूर्ण होण्या आधीच केले जाते.
विशेषत: खैबर पख्तुनख्वा आणि गिलगिट बाल्टिस्तान सारख्या प्रदेशांमध्ये ही समस्या जास्त आहे, जिथे सांस्कृतिक आणि सामाजिक नियम बऱ्याचदा कमी वयात लग्न करण्यास प्रोत्साहित करतात. तर या देशांमध्ये असे काही कार्यकर्ते आहेत जे बालविवाह रोखण्यासाठी कडक कायदे आणि कठोर शिक्षेची मागणी करत आहेत. गेल्या वर्षी खैबर पख्तुनख्वामधील पेशावर येथे घडलेल्या एका घटनेने या समस्येवर प्रकाश टाकण्यात आला होता. दरम्यान पाकिस्तानमध्ये 12 वर्षाच्या मुलीशी लग्नाचा प्रयत्न करणाऱ्या 72 वर्षीय वृद्ध व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान लग्नाचा करार होणार होता, तेव्हा वेळीच अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून मुलीची बालविवाह होण्यापासून सुटका केली. यावेळी मुलीचे वडील आलम सय्यद यांनी हबीब खान नावाच्या वृद्ध व्यक्तीशी पाच लाख पाकिस्तानी रुपयांमध्ये तिचे लग्न लावून देण्याचे मान्य केले होते. या संदर्भात ७२ वर्षीय खानला अटक झाली असली तरी मुलीचे वडील आलम सय्यद पळून जाण्यात यशस्वी झाला.
या समस्येवर तोडगा काढण्याचे प्रयत्न करूनही पाकिस्तानात बालविवाह हे एक गंभीर आव्हान आहे. मुलांचे कमी वयात होणारे लग्न आणि त्यासोबत होणारे दुष्परिणाम यापासून संरक्षण करण्यासाठी कडक कायदा आणि अंमलबजावणी व्हावी, यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत.