Viral Car : सर्व्हिस सेंटरची ऐशीतैशी | मालकाने कारला गाढव लावले आणि वाजत गाजत मिरवणूक काढली, कारणंही तसंच

| Updated on: Apr 27, 2023 | 7:35 PM

Viral Car : जगात केव्हा काय होईल काही सांगता येत नाही, कधी कधी नाराजी व्यक्त करण्याची स्टाईलच इतकी भाव खाऊन जाते की, विचारता सोय नाही. राजस्थानमधील एका कार मालकाने केलेली गांधीगिरी सध्या व्हायरल होत आहे.

Viral Car : सर्व्हिस सेंटरची ऐशीतैशी | मालकाने कारला गाढव लावले आणि वाजत गाजत मिरवणूक काढली, कारणंही तसंच
Follow us on

नवी दिल्ली : नवीन कार (New Car) घेतली की, तुफान दामटायची असं प्रत्येकांचं स्वप्न असतं. नवीन कार खरेदी केली की, अनेक जण मस्त फिरुन येतात. पण कधी कधी कारची खरेदी मनस्ताप देणारी पण ठरते. राजस्थान मधील उदयपुर (Udaipur) येथील एका तरुणाच्या चारचाकीच्या स्वप्नाला असाच सुरुंग लागला. त्यानं मोठ्या हौसेनं नवी कोरी कार खरेदी केली. पण ही कार तापदायक ठरली. सासूरवाडीत या नव्या कोऱ्या कारनं त्याची इज्जत पार धुळीला मिळवली तेव्हा, या पठ्ठ्याचा काटा सरकला, त्याचा रागाचा पारा चढला. मग, काय त्यानं केलेली गांधीगिरी (Gandhigiri) संपूर्ण देशातच नाही तर जगात व्हायरल झाली.

गाढवाने ओढली गाडी
पारा सरकल्यावर ही या पठ्ठ्याने आपल्या खास अंदाजात या नवीन कारचाच नाही तर योग्य सेवा न दिल्याचा समाचार घेतला. या तरुणाचे नाव राजकुमार पुर्बिया असे आहे. नवीन कारचा मनस्ताप झाल्यानंतर पुर्बिया यांनी दोन गाढवं बोलावली आणि त्यांना ही नवी कोरी कार बांधली. त्यानंतर या कारची वरात शो-रुमपर्यंत नेली.

हे सुद्धा वाचा


काय होते कारण
उदयपुरमधील सुंदरवास येथे राहणारे राजकुमार यांनी काही दिवसांपूर्वी हुंदाईची क्रेटा कार खरेदी केली होती. पण काही अंतरावर गेल्यावर ही कार बंद पडत होती. कारमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड होता. त्यांनी शो-रुम आणि कंपनीच्या सर्व्हिस सेंटरकडे याविषयीची तक्रार केली. पण त्यांना त्यांच्याकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. वारंवार तक्रार करुनही फायदा न झाल्याने त्यांनी अखेर कंपनी, शो-रुम, सर्व्हिस सेंटरला झटका देण्याचे ठरविले. गाढवांनी त्यांची कार शो-रुमपर्यंत ओढत (Donkey Pulled Car) नेली.

दीड महिन्यापूर्वी खरेदी केली होती कार
याविषयीच्या वृत्तातील दाव्यानुसार, राजकुमार यांनी ही कार जवळपास दीड महिन्यांपूर्वी खरेदी केली होती. पण ही कार काही दिवसांतच बंद पडू लागली. त्यांनी याविषयी शो-रुमला कळविले. पण त्यांनी दखल घेतली नाही. ते नवीन कारसह सासूरवाडीत पोहचले. येथे तर कारने त्यांचे पार पानिपत करुन टाकले. धक्के मारुन मारुन सासूरवाडीतील लोक धास्तावले. त्यामुळे त्यांनी या अपमानाचा शो-रुमकडून बदला घेण्याचे ठरविले. गाढवं लावून ओढतच त्यांनी ही कार शो-रुमला पोहचत केली.

संधी देऊन ही आले नाहीत
राजकुमार यांच्या दाव्यानुसार, पहिल्यांदा त्यांनी कंपनीच्या शो-रुमला फोन केला. नादुरुस्त कार नेण्याचा आग्रह केला. पण कंपनीने तात्काळ ही कार नेण्यास नकार दिला. त्यामुळे अगोदरच नाराज झालेल्या राजकुमार यांनी शो-रुमला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दोन गाढवं मागवून, त्यांना कार बांधून, शो-रुमपर्यंत नेली.