ज्या माहेरच्या घरात मुलगी लहानाची मोठी होते, त्या घरातून काढता पाय घेताना कोणत्याही मुलीचे अंतकरण जड होते. माहेरातून सासरच्या घरी निघतानाचा हा हळवा प्रसंग प्रत्येक घरात अनुभवायला मिळतो. सोशल मीडियात सध्या अशाच एका भावनिक प्रसंगाचा व्हिडिओ तुफान व्हायरल (Emotional Video Viral on Social Media) झाला आहे. त्यातल्या मुलीच्या पित्याने दिलेला सल्ला (Father give advise to daughter) फारच चर्चेत आला आहे. सासरच्या प्रत्येक वाद विवादात (Dispute) हार मान, तर तू संसार अर्थात जीवनाचे युद्ध जिंकू शकतेस, असा कानमंत्र नववधूला तिच्या पित्याने दिला आहे.
भारतातील प्रत्येक हिंदू कुटुंबामध्ये मुलीला ती घरची लक्ष्मी असल्याचे मानले जाते. मुलीच्या जन्मावेळी ती लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या संसारात आल्याचा आनंद व्यक्त केला जातो. मात्र ज्यावेळी हीच मुलगी परक्या अर्थात सासरच्या घरात नांदायला जाते, त्यावेळी मुलीचे संपूर्ण कुटुंबच भावनिक होते.
Best advice from father♥️? pic.twitter.com/mcDySAA58n
— Heer (@High_Heel_Babe) October 12, 2022
लग्न आणि त्यानंतरचे सर्व विधी आटोपून येणारा निरोपाचा क्षण नववधूच्या मातापित्यासह सर्वांनाच जड जातो. यादरम्यान प्रत्येक आई-वडील आपल्या मुलीला सासरच्या घरी सुखाने नांदण्यासाठी आपल्या अनुभवातून वेगवेगळे कानमंत्र देत असतात.
आपल्या मुलीने सासरी सुखाने संसार करावा, अशीच प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. त्यातही मुलगी आणि बापाचं नातं फार घट्ट मानलं जातं. त्यामुळे लग्न सोहळ्यात मुलीला माहेरातून निरोप देताना बाप त्याचं दुःख आवरू शकत नसतो.
मुलगीही अत्यंत भावनिक होत असते. व्हायरल व्हिडिओमध्येही मुलगी आणि बापामधील भावनिक निरोपाचा क्षण सर्वांच्याच ह्रदयाला स्पर्श करणारा आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये बापाने त्याच्या मुलीला दिलेला सल्ला सध्या सोशल मीडियात अधिक चर्चेत आला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. बापाने थेट सासरच्या घरांमध्ये होणाऱ्या वादविवादाच्या पार्श्वभूमीवर मुलीला कानमंत्र दिला आहे.
सासरच्या घरी होणाऱ्या वादामध्ये स्वतःला अधिक मोठे समजण्याचा प्रयत्न मुळीच करू नको. ज्यावेळी सासरच्या घरामध्ये होणाऱ्या वादविवादामध्ये हार मानशील, त्याचवेळी तू जीवनाच्या युद्धामध्ये बाजी मारू शकशील, असा प्रेमाचा सल्ला नववधूला तिच्या पित्याने दिला आहे.
कधी असा समज करून घेऊ नकोस की लग्न झाले म्हणजे माझे आणि वडिलांच्या घराचे संबंध संपले आहेत. मुलीचे तिच्या वडिलांच्या घराशी असलेले संबंध कधीच संपत नसतात, हे लक्षात ठेव. मनमोकळेपणाने भावना व्यक्त कर. मनामध्ये भावनांची कोंडी होऊ देऊ नको.
कोणतीही गोष्ट मनातल्या मनात ठेवून झोपू नको. माहेरला निरोप देताना डोळ्यांत अश्रू ढळू देऊ नकोस. मी तो बाप आहे, जो मुलीला माहेरच्या घरातून निरोप देताना अर्थात कन्यादान करताना तितकाच खुश आहे, अशी भावना नववधूच्या पित्याने व्यक्त केली आहे.
मुलगी आणि पित्यातील भावनिक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये फार लोकप्रिय झाला आहे. ट्विटरवर हीर नावाच्या पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर कमेंट्सचा मोठ्या प्रमाणावर वर्षाव झाला आहे. विशेषतः अनेक तरुणींनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.