नवी दिल्ली : कॉलेजमध्ये मुलांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे, भलते सलते उद्योग करू नये म्हणून आपल्या येथील पालक मंडळी टेन्शनमध्ये असतात. महाविद्यालयात मुलांनी अभ्यासाव्यतिरिक्त इतर कोणत्याही भलत्या सलत्या गोष्टीत लक्ष घालू नये म्हणून पालक दक्ष असतात. मात्र असे असताना आपला शेजारी असलेल्या या देशातील महाविद्यालयांनी त्यांच्या मुलांनी प्रेमात पडावे यासाठी खास सात दिवसांचा ‘लव्ह ब्रेक’ मंजूर केला आहे.
चीनच्या महाविद्यालयांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना ( वसंत ऋुतू ) ‘स्प्रिंग ब्रेक’ नावाने प्रेमात पडण्यासाठी खास सुट्टी मंजूर केली आहे. या वसंत ऋुतूच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना होम वर्कही देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी डायरी लिहावी, आपला व्यक्तीगत विकासाची नोंदी कराव्यात, त्यांच्या प्रवासाचे व्हिडीओ रेकॉर्ड करावेत असा मनपसंद अभ्यासही दिला आहे. चीनला त्यांचा जन्मदर घसरल्याने चिंचा सतावत आहे. त्यामुळे चीनच्या नऊ महाविद्यालयांनी एक नवीन संकल्पना राबवित विद्यार्थ्यांना प्रेमात पडण्यासाठी खास रजा मंजूर केली आहे.
एनबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानूसार मियांगयांग फ्लाईंग व्होकेशनल कॉलेजने सर्वात आधी रोमान्सकरण्यावर फोकस देण्यासाठी 21 मार्चला स्प्रिंग ब्रेक देण्याची घोषणा केली. 1 ते 7 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना निसर्ग आणि जीवनाशी प्रेम करणे शिकण्यासाठी तसेच वसंत ऋुतूत प्रेमाचा आनंद घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. कॉलेजच्या डेप्युटी डीनने म्हटले आहे की आम्हाला आशा आहे की या दिवसात मुले हिरवीसृष्टी, निसर्ग आणि डोंगर दऱ्या पाहायला जातील आणि त्यांच्यात प्रेम भावना जागृत होईल.
वन चाइल्ड पॉलिसीमुळे संकट
चीनच्या वन चाइल्ड पॉलिसीमुळे हे संकट आले आहे. साल 1980-2015 पर्यंत लागू असलेल्या या वन चाइल्ड पॉलिसीमुळे चीनचा जन्मदर कमालीचा घटला आहे. चीनच्या सरकारने जन्मदर वाढविण्यासाठी 20 हून अधिक सिफारसी केल्या आहेत. चीनमध्ये गेल्यावर्षी 1000 लोकांमागे 6.77 जन्मदर होता. हाच आकडा 2021 मध्ये 7.52 होता. साल 2021 मध्ये तीन मुलांना जन्म देण्याचे धोरण लागू झाले. मुलांची नोंदणी करण्यासाठी महिलांना आता कायदेशीररित्या विवाहित असण्याची अट ही रद्द केली आहे. तरीही लोक मुलांना जन्म घालायाला तयार नाहीत. वाढती महागाई, महागलेले शिक्षण, कमी वेतन, सामाजिक सुरक्षेचा अभाव आणि वाढती लैंगिक असमानता यामुळे चीन बेजार झाला आहे.