गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा (buldhana) जिल्ह्यातील शेगाव (shegaon) तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचा शेतीमाल विकत घेऊन 10 ते 12 कोटी रुपये घेऊन पसार झालेल्या आरोपीला अटक करा, अशी मागणी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी पोलिस प्रशासनाला केली आहे. शेतकऱ्यांनी 10 दिवसांपूर्वी पसार झालेला व्यापारी राहुल चौधरी वर शेगांव पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसांनी व्यापाऱ्याचा शोध घेतला नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. भुसावळ (bhusawal) येथील व्यापारी राहुल चौधरी हा एक वर्षापासून शेगावात वास्तव्यास होता. त्याने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करुन शेगांव तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी केला. 10 ते 12 कोटी रुपयाचा माल विकत घेऊन पसार झाला आहे.
याप्रकरणी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध मात्र अद्यापही लागला नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांनी ठाणेदार यांची भेट घेऊन तत्काळ आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच सदर प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करा, अशी मागणी सुद्धा स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी केलीय.
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम वाया गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. सरकारकडून दोन्हीवेळा तुटपुंजी मदत मिळाली असल्याचं शेतकरी सांगत आहे. बदलत्या वातावरणाचा शेतीला मोठा फटका बसला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या फळबागांचं मोठं नुकसान झालंय. त्यामध्ये व्यापाऱ्याकडून फसवणूक झाली आहे, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.