मुंबई : विवाह म्हणजे साता जन्माच्या गाठ, सात फेरे घेऊन वधू आणि वर थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेत असतात. आणि पती आणि पत्नी एकमेकांनी सुखी ठेवण्याचे वचन देत असतात. परंतू एक विचित्र विवाह अलिकडेच घडला आहे. तेथे नवऱ्या मुलाने दोन सख्या बहीणीशी एकाच मांडवात विवाह केला आहे. या विवाहास कोणाचाच विरोध नसून सर्वांनी नवरदेवाचे कौतूक करीत आशीर्वाद दिले आहेत. राजस्थानातील टोंक जिल्ह्यातील एका सुशिक्षित हरिओम मीणा याचा दोन सख्या बहिणीशी एकाच मांडवात झालेला विवाह पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे.
उनियाराच्या मोरझाला येथील झोपडीया गावातील हे प्रकरण आहे. हरिओमचे कुटुंबिय त्याच्यासाठी मुलगी पहात होते. तेव्हा दौरान निवाई येथील सीदडा गावातील बाबूलाल मीणा यांची मुलगी कांता हीच्या विवाहाची बोलणी झाली. जेव्हा कांताला पहायला या युवकाचे नातलग गेले तेव्हा तिने आपल्यासह आपल्या लहान बहिणीची जबाबदारी आपल्यावर आहे. जर एका मांडवात आम्हा दोघी बहीणीशी लग्न झाले तरच आपण लग्नाला तयार होऊ असे कांता हीने हरीओम याला सांगितले. कांता हीची विचित्र अट ऐकून सुरूवातीला हरीओमचे नातलग हैराण झाले. शेवटी बहीणीच्या प्रेमापोटी तिने घेतलेला हा निर्णय पाहून तेही राजी झाले.
कांता हीचे शिक्षण बीएडपर्यंत झाले आहे. तर तिची मानसिक दृष्ट्या कमजोर बहीण सुमन हीचे शिक्षण केवळ आठवी पर्यंत झाले आहे. लहान बहीणीच्या काळजी पोटी एकाच मांडवात दोघींशी लग्न करण्यास नवरदेव काळजावर दगड ठेवून तयार झाला. अखेर ५ मे रोजी हा अनोखा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. लग्नाच्या पत्रिका छापण्यात आल्या. त्यावर वधूच्या जागी दोघींचे नाव लिहीण्यात आले. दोन्ही बहीणींनी एकाचवेळी वराबरोबर सप्तपदी पूर्ण केली. हरिओमच्या दोन्ही पत्नींनी एकसाथ गृहप्रवेश केला. आणि सासरच्या लोकांनी मोठ्या थाटामाटात दोन्ही सख्या बहिणींचे नववधू म्हणून जोरदार स्वागत केले.
हरिओमच्या या निर्णयाचा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला काहींनी या गोष्टीला हसण्यावारी नेले तर काहींनी त्याच्या निर्णयाला एक अनोखा पायंडा पाडला म्हणून कौतूकही करीत त्याच्या कुटुंबाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. या दोन्ही पत्नींना आपण कोणतेही दु:ख देणार नसल्याचे वचन हरिओम याने दिले असून त्यांच्यात चांगले नाते निर्माण व्हावे असे म्हटले आहे.