मुंबई : भारतीय रेल्वे म्हणजे चमत्कार म्हटला जातो. देशात दररोज दोन कोटीहून अधिक प्रवासी ट्रेनने रोजचा प्रवास करीत असतात. आपल्याला अनेकदा रेल्वेने प्रवास करताना अनेक स्थानकांच्या नावानंतर टर्मिनस किंवा टर्मिनल असे लिहीलेले आढळते. काही स्थानकांच्या नावानंतर जंक्शन असे लिहीले जात असते. असे का म्हटले जात असते , याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? रेल्वे स्थानकांना टर्मिनस किंवा टर्मिनल वा जंक्शन असे का म्हटले जात आहे. कोणत्या स्थानकांनंतर हे तीन शब्द वापरले जातात पाहूया..
टर्मिनल / टर्मिनस मध्ये काय अंतर
रेल्वेच्या शब्दकोषात टर्मिनल आणि टर्मिनस काही वेगवेगळा अर्थ नसून दोन्ही शब्दांचा अर्थ एकसारखाच असतो असे म्हटले जात आहे. खरे तर रेल्वे टर्मिनलचा अर्थ शेवटचे स्टेशन अशा अर्थाने घेतला जातो. जेथून ट्रेन पुढे जात नाही त्याला टर्मिनल म्हटले जाते. देशातील काही टर्मिनल किंवा टर्मिनसचा विचार केला तर मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) आणि दिल्लीच्या (Anand Vihar Terminal )आनंद विहार टर्मिनल यांचा यात समावेश आहे.
जंक्शन म्हणजे काय रे भाऊ ?
रेल्वेच्या परिभाषेत जंक्शन (Junction) अशा स्थानकाला संबोधतात जेथून दोन हून अधिक ठिकाणी जाणारे मार्ग निघत असतात. सोप्या भाषेत एका जंक्शनमध्ये एका ट्रेनसाठी कमीत कमी तीन मार्ग तयार केलेले असतात. ज्यामधून एका मार्गाने ट्रेन येते आणि उर्वरित दोन मार्गापैकी ती ट्रेन तिच्या ठरलेल्या मार्गाने बाहेर पडते. त्यामुळे रेल्वेच्या ट्रॅफिकचा गुंताही सुटण्यास मदत होत असते. देशातील सर्वात जास्त मार्ग असणारे जंक्शन मथुरा जंक्शन आहे. येथून तब्बल सात मार्ग बाहेर पडतात. आहे की नाही चमत्कारीक रेल्वेचे जाळे.
सेंट्रल कशाला म्हणतात..?
रेल्वे स्थानकाच्या नावानंतर सेंट्रल असे नावानंतर लिहीले असेल तर त्याचाही वेगळा अर्थ आहे. जर कोणत्या रेल्वे स्थानकाला सेंट्रल असे म्हटले जात असेल तर ते स्थानक शहरातील सर्वात मुख्य आणि जुने रेल्वे स्थानक आहे. या स्थानकात एकाच वेळा अनेक ट्रेन प्रवेश करीत असतात. सेंट्रल स्टेशन अशाच शहरात तयार केले जाते, जेथे अन्य रेल्वे स्थानकेही असतात. सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या मदतीने मोठ्या शहरांना एकमेकांनी जोडले जाते. देशातील काही प्रमुख सेंट्रल रेल्वे स्थानकांचे उदाहरण द्यायची असतील तर मुंबई सेंट्रल आणि कानपूर सेंट्रल यांची नावे वानगी दाखल आहेत.