मुंबई, तुमच्या सभोवतालच्या इतरांपेक्षा तुम्हाला नेहमीच जास्त डास चावतात (mosquito Bite) का? याचे उत्तर जर हो असेल तर या मागे काही शास्त्रीय कारण आहे हे जाणून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, वेगवेगळ्या अभ्यासातून वेगवेगळे निष्कर्ष समाेर आले आहेत. रक्तगट हे यामागचे एक कारण असू शकते. रक्ताचा प्रकार तसेच इतर अनेक घटक हे ठरवतात की तुम्ही डासांसाठी किती आकर्षक आहात. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आणि झिका यांसारख्या विविध घातक आजारांचा प्रसार करण्यासाठी डास कारणीभूत आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, इतरांपेक्षा काही लोकांकडे डास जास्त आकर्षित हाेण्यामागे रक्तगट हे कारण असू शकते. याशिवाय इतरही गाेष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत.
संशोधक आणि शास्त्रज्ञ अनेक दशकांपासून डासांचे वर्तन आणि नमुने समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वसाधारणपणे, डास इतर रक्तगटाच्या लोकांपेक्षा O रक्तगट असलेल्या लोकांना चावण्यास प्राधान्य देतात. तसेच डास हे रक्ताच्या प्रकाराकडे दुर्लक्ष करून, नॉन-सेक्रेटर्सपेक्षा सेक्रेटर्सकडे जास्त आकर्षित होतात.
एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, डासांच्या काही प्रजाती O रक्तगट असलेल्या लोकांकडे दुप्पट आकर्षित होतात. O हा डासांचा पसंतीचा रक्त गट आहे आणि A हा सर्वात कमी पसंतीचा आहे. B रक्तगट असलेले लोकं O आणि A स्पेक्ट्रमच्या मध्ये कुठेतरी येतात.
जर डासांना तुमच्या शरीराचा वास आवडत असेल तर ते तुमच्याकडे जास्त आकर्षित हाेतील. तुमच्या शरीराच्या वासावर परिणाम करणाऱ्या काही प्रमुख घटकांमध्ये या गाेष्टींचा समावेश आहे.