उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील एक 36 वर्षीय महिला नवरा आणि सहा मुलांना सोडून एका भिकाऱ्यासोबत पळून गेली आहे. त्यामुळे तिचा नवरा चांगलाचा हादरून गेला आहे. तिच्या नवऱ्याने तात्काळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम 67 अन्वये तक्रार दाखल केली आहे. आपल्या पत्नीचं अपहरण झाल्याचा दावा त्याने या तक्रारीत केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या व्यक्तीच्या पत्नीचा आणि भिकाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
पळून गेलेल्या महिलेच्या नवऱ्याचं नाव राजू असं आहे. तो 45 वर्षाचा आहे. त्याने याप्रकरणाची माहिती दिली. पत्नी राजेश्वरी आणि सहा मुलांसोबत तो हरदोईच्या हरपालपूर परिसरात तो राहतो. नन्हे पंडित नावाचा भिकारी कधी कधी आमच्या इकडे भीक मागायला यायचा. तो नेहमीच राजेश्वरीशी बोलायचा. दोघं फोनवरही बोलायचे. त्यामुळे ती त्याच्यासोबतच पळून गेल्याचं सांगत राजू याने याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.
3 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास माझी पत्नी राजेश्वरीने आमची मुलगी खुशबूला सांगितले की, ती कपडे आणि भाजी खरेदी करण्यासाठी बाजारात जात आहे. पण त्यानंतर ती परत आलीच नाही. मी तिचा अनेक ठिकाणी शोध घेतला. ती सापडली नाही. माझ्या बायकोने म्हैस विकून आलेले पैसेही लंपास केले आहेत. एकूण 1 लाख 60 हजार रुपये घेऊन ती घरातून पळाली आहे. नन्हे पंडितच तिला घेऊन पळाला असावा असा संशय राजू याने व्यक्त केला आहे.
दरम्यान, हरपालपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी राजदेव मिश्रा म्हणाले की, राजू नावाच्या व्यक्तीने त्याची पत्नी भिकाऱ्याने पळवून नेल्याची तक्रार केली आहे. घरातील पैसेही ती घेऊन पळाली आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे आम्ही गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. दोघे पळून गेल्यापासून त्यांचे मोबाईल नंबर बंद आहेत. आमच्या लग्नाला 20 वर्ष झाली आहेत. आम्हाला सहा मुले आहेत. तरीही माझ्या बायकोला फूस लावून भिकारी घेऊन गेला आहे, असं राजूने सांगितलं.
दरम्यान, या प्रकरणात ट्विस्ट आला आहे. पोलिसांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून माहिती दिली आहे. ही महिला भिकाऱ्यासोबत पळून गेली नव्हती तर ती तिच्या नातेवाईकाच्या घरी गेली होती. तिचा नवरा तिला मारझोड करत असल्याने ती घर सोडून गेली होती. महिला कुणासोबत तरी पळून गेल्याची चर्चा खोटी असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.