लग्न म्हटलं की जसं प्रेम आलं तसंच राग, भांडणही आलीच. प्रत्येक पती-पत्नीमध्ये भांडणं ही होतचं असतात, पण काहीवेळा ती इतकी वाढतात की त्याचा परिणाम घरातल्यांवर, तसेच मुलांवरही होतो. मुलं त्यात भरडली जातात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीशी भांडण झाल्यानंतर एका महिलेने जे केलं ते ऐकून कोणाचाही थरका उडले. त्या महिलेने तिच्याच पोटच्या दोन मुलांना वेठीस धरत त्यांना थेट 23 मजल्यावर लटकावलं. हो, हे खरं आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 23 व्या मजल्यावरील मुलांना पाहून इतर लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यांनी त्या महिलेवर शिव्यांचा वर्षाव करत टीकेचा भडिमार केला.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, ही घटना सेंट्रल चीनमधील हेनान प्रांतातील लुओयांग येथे घडली. एका बहुमजली इमारतीच्या 23 व्या मजल्यावर असलेल्या अपार्टमेंटच्या बाहेरील एसीला दोन मुलं लटकलेली दिसताच लोकांचा थरकाप उडाला. शेजाऱ्यांच्या सांगण्यानुसार, त्या दोन्ही मुलांची आई शेजारच्या खिडकीत होती आणि पतीच्या नावाने ओरडत होती. तेवढ्यात एक व्यक्ती त्या मुलांना वाचवण्यासाठी पुढे सरसावली पण तिने त्याला रोखलं.
व्हिडीओ व्हायरल
या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला असून त्यामध्ये दोन लहान मुलं एसीच्या युनिटवर बसलेली दिसत आहेत. तर त्यांच्या बाजूलाच खिडकीत बसलेली आई मात्र मुलांचा जीव धोक्यात घालून पतीशी भांडण्यात मग्न होती. ती सतत ओरडत होती, चिडलेली होती तर तिचा पती मात्र शांत होता आणि त्यांच्या मुलांना आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करत होता. तो खिडकीच्या दिशेने पुढे आला पण त्याच्या बायकोन त्याला थांबवलं.
हा सगळा प्रकार पाहून शेजारीही हबकले होते, पण त्यांनी प्रसंगावधान दाखवून लगेचच पोलिसांना या घटनेची सूचना दिली. त्यानंतर पोलिस तसेच फायर ब्रिगेडची टीमही घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी त्या मुलांना वाचवलं. मात्र हा भीषण प्रकार करणाऱ्या त्या महिलेविरोधात नेमकी काय कारवाई करण्यात आली हे अद्याप समजू शकलेलं नाही.
Mum in China leaves kids outside 23rd floor window to annoy husband
The China Women and Children’s Federation said it was looking into the matter pic.twitter.com/h8NtrNkTSg
— MustShareNews (@MustShareNews) October 17, 2024
आई आहे की हैवान !
जीवाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही वेगाने व्हायरल झाला असून लोकांनी तिच्यावर टीकेचा वर्षाव केलाय. आई-वडिलांच्या भांडणात मुलांना शिक्षा कशासाठी ? असा प्रश्न एका यूजरने विचारला. तर कोणतीही आई अंस कसं वागू शकते ? असा सवाल दुसऱ्याने उपस्थित केला. ही तर रानटीपणाची हद्द झाली, या महिलेचे मानसिक संतुलन बिघडलंय असं वाटतं, असा संताप त्याने व्यक्त केला. ही आई आहे का हैवान ! 23 व्या मजल्यावरून मुलं पडली तर काय हालत झाली असती, याचा तरी विचार करायचा ना, असं लिहीत आणखी एका युजरने तिच्यावर टीका केली.