नवी दिल्ली : तुम्हाला अरुणा शानबागची कहानी माहीत असेल. १९७३ ची गोष्ट. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरीयल म्हणजे केईएम रुग्णालयात ती ज्युनीअर परिचारिका म्हणून कार्यरत होती. त्याच रुग्णालयात काम करणाऱ्या एका सफाई कर्मचाऱ्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे ती परिचारिका कित्येक वर्षे कोमात होती. परंतु, तुम्हाला हे माहीत आहे का की, अशीही एक महिला होती जी ४२ वर्षे कोमात होती. तिचे कहानी वाचून डोळ्यात पाणी येईल. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, या महिलेचं नाव एडवर्डा ओबारा होतं. ती अमेरिकेची राहणारी होती. एक-दोन वर्षे नाही तर ती तब्बल ४२ वर्षे कोमात होती. मेडिकलच्या इतिहासात हा सर्वात मोठा कोमात राहण्याचा रेकॉर्ड आहे. सगळ्यात मोठी बाब म्हणजे ती मधुमेहाची शिकार होती. यामुळे ती कोमात गेली होती.
एडवर्डा ही १६ वर्षांची असताना ३ जानेवारी १९७० रोजी कोमात गेली. लहानपणापासून तिला मधुमेह झाला होता. १९६९ मध्ये तिला न्यूमोनिया झाला. न्यूमोनिया तिच्यासाठी मोठं संकट घेऊन आला. दोन्ही आजारांनी ती ग्रस्त होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, ती कोमात गेली. मृत्यू होईपर्यंत ती कोमातच राहिली.
कोमात जाण्यापूर्वी एडवर्डाने आपल्या आईला मदत करण्याचे आश्वासन मागितले होते. आईने ते शेवटपर्यंत निभावले. मुलगी कोमात गेल्यानंतर ३८ वर्षे जीवंत असेपर्यंत आईने तिला मदत केली. तिची आई एका वेळी दीड तासापेक्षा जास्त झोपत नव्हती. मुलीशी बोलून तिला गाणे ऐकवीत असे. मुलीचा सांभाळ करण्यासाठी तिने नोकरी सोडली. त्यामुळे तिला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला. एडवर्डाच्या उपचारासाठी २००७ पर्यंत त्यांना २ लाख डॉलर म्हणजे १ कोटी ६५ लाख रुपयांचे कर्ज झाले होते.
२००८ साली ८१ व्या वर्षी एडवर्डाच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर एडवर्डाच्या लहान बहिणीने तिची देखभाल केली. सुमारे चार वर्षे ती बहिणीचे सेवा करत होती. परंतु, २१ नोव्हेंबर २०१२ ला एडवर्डा जग सोडून गेली.