आधार कार्ड प्रमुख आणि महत्त्वाचं ओळखपत्र आहे. जन्मानंतर ते मृत्यपर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड जवळपास बंधनकारक आहे. प्रत्येक ठिकाणी ओळखपत्र म्हणून आधार कार्डाची मागणी केली जाते. तसेच बँकेत खातं उघडण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड पाहिजे म्हणजे पाहिजेच. यावरुन आपल्याला आधार कार्ड किती महत्त्वाचं आहे, हे लक्षात येतं. आधार कार्डबाबत सरकारकडून सातत्याने काही न काही निर्णय घेतले जातात. याच आधार कार्डधारकांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे.
आधार कार्ड अपडेट करुन घेण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहे. आधार कार्डधारकांना पुढील काही तासांत मोफत अपडेट करुन घेता येणार आहे. मात्र सरकारने सांगितलेल्या मुदतीनंतर आधार कार्डात अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे नंतर पैसे खर्च करायचे नसतील, तर आताच या संधीचा फायदा घ्या.
नियमांनुसार, दर 10 वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करावं लागतं. ज्या नागरिकांनी 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड काढलं होतं, ते आता मोफत अपडेट करु शकतात. नावात आणि फोटोत बदलही मोफत करुन मिळणार आहे. यूआडीएने दिलेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबरपर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करुन घेता येणार आहे. मात्र त्यानंतर नियमांनुसार ठरलेली रक्कम द्यावी लागणार आहे.
नागरिक ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने सोयीनुसार आधार कार्ड अपडेट करु शकतात. नागरिक, फोटो,पत्ता, नाव, लिंग, जन्मतारीख बदलू शकतात. तसेच मोबाईल नंबर आणि इमेल आयडीही अपडेट करु शकतात.
आधार कार्डात तुम्हाला आवश्यक असलेले बदल घर बसल्या करु शकता. तसेच कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊनही बदल करता येतील. मात्र आधार कार्डात बदल करून घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्र लागू शकतात. शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र, पारपत्र आणि अन्य ओळखपत्रांची गरज लागू शकते.