मुंबई : वाढत्या महागाईपासून (Inflation) दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल, डिझेलवरील अबकारी करात कपात करण्याची घोषणा केंद्राकडून शनिवारी करण्यात आली. त्यानंतर देशात पेट्रोल (Petrol), डिझेलचे दर स्वस्त झाले आहेत. पेट्रोलचा दर प्रति लिटर मागे साडेनऊ रुपयांनी तर डिझेलचा दर सात रुपयांनी स्वस्त झाला आहे. केंद्राने उत्पादन शुल्कात कपात करताच राजस्थान, ओडिशा आणि केरळने देखील पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या व्हॅटमध्ये कपात केली आहे. राजस्थानने पेट्रोलवरील व्हॅटमध्ये 2.48 तर डिझेलवर 1.16 रुपयांची कपात केली आहे. ओडिशाने पेट्रोलवरील व्हॅटमध्ये 2.23 आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये 1.36 रुपयांची कपात केली आहे. तर केरळ सरकारने पेट्रोल, डिझेलवरील व्हॅटमध्ये अनुक्रमे 2.41 आणि 1.36 रुपयांची कपात केली आहे. केंद्राने आतापर्यंत दोनदा कर कपातीचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर अनेक राज्यांनी केंद्रांच्या आवाहानाला प्रतिसाद देत व्हॅटमध्ये कपात केली आहे. मात्र महाराष्ट्रात अद्यापही व्हॅटमध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. राज्यात व्हॅट कपात कधी होणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
समजा जर एखाद्या राज्यात पेट्रोलचा दर हा प्रति लिटर 100 रुपये असेल तर प्रत्यक्षात पेट्रोलची मूळ किंमत 36 रुपये इतकीच असते. त्यावर केंद्र आणि राज्य सरकार मिळून 64 रुपये कर लावतात. या 36 रुपयांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती, डिलर्स आणि इतर सर्व खर्चाचा समावेश असतो. पेट्रोलची किंमत जर 100 रुपये असेल तर केंद्र सरकारकडून पेट्रोलवर 40 टक्क्यांपर्यंत कर आकारला जातो. तर राज्य सरकारच्या वतीने 24 टक्क्यांपर्यंत कर आकारण्यात येतो. सध्या महाराष्ट्रात पेट्रोलवर प्रति लिटर मागे 31.1 रुपये इतका व्हॅट आकारण्यात येत आहे. केंद्राने अबकारी करात दोनदा कपात केली आहे. मात्र राज्यात अद्याप व्हॅट कमी करण्यात आला नसल्याने सरकारवर व्हॅट कमी करून जनतेला दिलासा देण्याचा दबाव वाढत आहे.
केंद्र सरकारने शनिवारी अबकारी करात कपात केली. करात कपात झाल्याने पेट्रोल, डिझेलच्या किमती देखील कमी झाल्या आहेत. पेट्रोल प्रति लिटर मागे साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले आहे. नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये झाला असून, डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा भाव 113.35 रुपये असून, डिझेलचा भाव 97.28 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल,डिझेलचा दर अनुक्रमे 102.63 आणि 94.24 रुपये प्रति लिटर इतका आहे.