Income Tax Saving News | जर तुमची वार्षिक कमाई (Yearly Income) 10 लाख रुपये असेल तर कराची चिंता वाहू नका. कर बचत (Tax Saving) हा ही तुमचा अधिकार आहे आणि विशेष म्हणजे सरकारनेच तो मान्य केला आहे. त्यामुळे काही टिप्सचे पालन केले तर एक रुपया ही कर भरावा लागणार नाही. तसं पाहिलं तर 10 लाख रुपयांचं उत्पन्न कर पात्र ठरते. त्यावर तुम्हाला प्राप्तीकर स्लॅबनुसार (Income Tax Slab) कर मोजावा लागतो. त्यातून तुमची सहजा सहजी सूटका होत नाही. पण सरकारनेच दिलेल्या नियमांचा (Rules) आधार घेऊन तुम्हाला कर सवलत करता येऊ शकते. त्यासाठी कर नियमांचा अभ्यास असणे आवश्यक आहे. सध्याच्या करविषयक कायद्यांमध्ये (Income Tax Act) अशा अनेक तरतुदी आहेत, ज्यांचा योग्य वापर केल्यास कराचा बोजा लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. तुम्हाला वार्षिक 10 लाख रुपयांच्या कमाईवर एक रुपयांचा ही कर सरकारकडे जमा करावा लागत नाही.
आयकर तज्ज्ञ, या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार वार्षिक 10 लाख रुपयांच्या कमाईवर तुम्हाला 50,000 रुपयांचे स्टॅंडर्ड डिडक्शन मिळते. म्हणजे तुमचे करपात्र 9.5 लाख रुपये ठरते. या उत्पन्नावर तुम्हाला कर भरावा लागतो. त्यानंतर 80सी अंतर्गत करबचत योजनेत (आयुर्विमा, सुकन्या समृद्धी योजना, मुलांचे शुल्क इ.) गुंतवणूक करून 1.50 लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. यामुळे तुमचे करपात्र उत्पन्न 8 लाख रुपयांपर्यंत कमी होते.
तज्ज्ञांच्या मते, एनपीएसचा (NPS) फायदा घेऊन तो आणखी कमी करता येईल. या माध्यमातून करपात्र उत्पन्न आणखी 50 हजार रुपयांनी कमी करता येईल. याशिवाय तुम्हाला आरोग्य विम्याची मदत घेता येईल. आरोग्य विम्याच्या माध्यमातून 25 हजार रुपये आणि आई-वडिलांच्या आरोग्य विमा योजनेच्या माध्यमातून 25 हजार रुपयांची सूट मिळू शकते. यामुळे तुमचे करपात्र उत्पन्न आता सात लाख रुपये होईल. त्यानंतर तुम्ही गृहकर्ज घेतलं असेल तर त्या माध्यमातून तुम्ही 2 लाख रुपयांपर्यंतची व्याज वजावट घेऊ शकता. आता तुमचे करपात्र उत्पन्न पाच लाख रुपये होईल.
कर तज्ज्ञांच्या मते, पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर सरकार कलम 87(अ) अंतर्गत 12,500 रुपयांची करसवलत देते. यामुळे तुमचे करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी होईल आणि एकदा का ते झाले की तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. हे उत्पन्न कलम 87 अ अंतर्गत पूर्ण सूट मिळण्यास पात्र आहे. अशाप्रकारे तुम्हाला दहा लाखांच्या उत्पन्नावर एक रुपयाही कर भरण्याची गरज राहत नाही. फक्त यासाठी योग्य तज्ज्ञाचा तेवढा सल्ला घ्यावा लागेल.