नवी दिल्ली : माता ही अनंत काळाची जननी असते. आईच्या प्रेमाच्या (Mother Loves) महतीचे गोडवे अवघे जग गाते. वडिलांच्या (Father) जबाबदारीची जाणीव कोणाला कळते? पण एका बाबाने केलेल्या त्यागाने सर्वांचाच समज चुकीचा ठरवला. पुरुषाच्या कठोर हृदयआड दडलेला प्रेमळ बाबा, केअरिंग पापाने (Caring Papa) सर्वांचीच मने जिंकली..
तर या प्रेमळ बाबाचं, अंकित जोशी असे नाव आहे. या लाडक्या प्रिसेंससाठी जोशींनी कोट्यवधींच्या नोकरीवर पाणी सोडले आहे. पॅटर्निटी लिव्ह आपल्या लाडक्या लेकीसाठी पुरेशी नसल्याने जोशींनी नोकरीचा राजीनामा दिला.
आईनेच का म्हणून एकटीने त्याग करायचा? अंकित जोशीने आईच्या प्रेमासोबतच आपल्या तान्हुलीला बाबाचं प्रेम मिळावं आणि तिला वेळ देता यावा यासाठी नोकरीला रामराम ठोकला.
अंकित जोशी यांनी खरगपूर येथील इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT Kharagpur) मधून पदवी मिळवली. त्यानंतर करिअरच्या पीक पाईंटवर असताना, त्यांच्या आयुष्यात आलेल्या या गोड परीने त्यांच्या जीवनाला कलाटणी दिली.
आपल्या लाडक्या लेकीच्या बाल लिला पाहता याव्यात, तिला वेळ देता यावा, तिचे लाड पुरविता यावे यासाठी जोशी यांनी त्यांच्या कंपनीच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. पण हा निर्णय या पठ्ठ्याने काही एकाकी घेतला नाही.
जोशी, त्याची मैत्रिण आणि पत्नी आकांक्षा हे दोघेही हिमाचल प्रदेशातील स्पिती व्हॅलीत फिरायला गेले होते. दोघेही या व्हॅलीच्या प्रेमात पडले. मुलगी झाली तर तिचे नाव या व्हॅलीच्या नावावरुन ठेवायचं असा निर्णय त्यांनी घेतला.
मुलीच्या आगमनापूर्वीच अंकितने तिच्यासाठी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. पॅटर्निटी लिव्ह (Paternity Leave) तिच्यासाठी पुरेशी ठरणार नाही. त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला. हा निर्णय त्याने नातेवाईक आणि मित्रांना कळविला, तेव्हा त्याला वेड्यात काढण्यात आले.
सर्वांनीच त्याला हा वेडेपणा न करण्याचा सल्ला दिला. गल्लेलठ्ठ पगाराच्या नोकरीवर पाणी सोडण्याचा त्याचा निर्णय नातेवाईकांच्या पचनी पडला नाही. पण त्याच्या या निर्णयाला त्याची पत्नी आकांक्षाने पाठिंबा दिला.
या कंपनीत अंकितला फार काळ झाला नव्हता. त्याने नव्यानेच ही जबाबदारी घेतली होती. पण मुलीच्या आगमानाने त्याने या नोकरीचा राजीनामा दिला. मुलगी स्पितीच्या जन्माच्यावेळी आणि तिच्या लहानपणी तिला वेळ देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले.
स्पितीच्या संगोपणात या जोडप्याचा एक महिना कसा निघून गेला, ते त्यांनाच कळले नाही. दरम्यान आकांक्षाला स्पितीच्या जन्मानंतर नोकरीत पदोन्नती मिळाली. तर अंकितने अजूनही नवीन नोकरीसाठी अर्ज केलेला नाही.
दमलेल्या बाबाची गोष्ट आपण ऐकलीच आहे. मुलाबाळांसाठी राब राबणाऱ्या बाबाचं कौतुक होत नसलं तर या बाबानं मात्र वेगळी वाट निवडली आणि लाडक्या लेकीसाठी करिअरही पणाला लावलं.